जनासाठी पानावर बसण्याच्या वेळेला जी सुगरण बाई भोजनअन्न घेऊन पळून जाते, तिने अन्य मार्गाने केलेला आदरसत्कार काय कामाचा?’
‘ठायीं बैसतिये वेळे। जे रससोय घेऊनि पळे।
तियेचा येरू वोडव (आदरातिथ्य) मिळे। कोण्या अर्था?’
ज्ञानदेव वेळप्रसंगी किती सूक्ष्म, नर्मविनोदी दाखला देतात, याचा अनुभव देणारी ही ओवी. इथे ते एक चित्रच साकारतात. थाटात पंगत बसली आहे आणि त्याच वेळी ‘रससोय’ पळवली. रससोय हा भोजनासाठी किती सुंदर शब्द योजला आहे! असं हे भोजन पळवलं, तर काय बिकट अवस्था होईल जेवायला आलेल्यांची. मोठ्या आशेनं आलेली ही सारी मंडळी. त्यांची भूक भागणार नाही, पदरी येईल घोर निराशा. इथे भुकेचा प्रसंग करुण आहे; पण सादरीकरण (रससोय घेऊनि पळे) असं चित्रमय आहे, ज्याला विनोदाची झालर आहे. हा मार्मिक दृष्टान्त आहे तेराव्या अध्यायात. श्रीकृष्णांनी अर्जुनाला अध्यात्मज्ञानाची ओळख करून दिली. याविषयीचं कथन ज्ञानदेवांनी श्रोत्यांना केलं. तेव्हा श्रोते प्रसन्न झाले. ते म्हणाले, ‘इतर कवी ज्ञानाविषयी न बोलता हवे तेवढे वर्णन करतात, तसे न करता तू आम्हांला आत्मज्ञानाची पूर्ण ओळख करून दिलीस.’ इतर कवींची वागणूक स्पष्ट करताना ज्ञानदेव योजतात वरील दृष्टान्त. जेवायला बोलावून समोरील जेवणच लांबवलं तर? त्याचप्रमाणे ज्ञानाविषयी सांगतो, असं म्हणून त्याविषयीची ओळख नीट करून दिली नाही तर काय उपयोग? असं इतर करतात, पण ज्ञानियांच्या कथनानं असं झालं नाही. श्रोत्यांची ज्ञानाची संपूर्ण भूक भागली. श्रोत्यांच्या या तृप्तीच्या स्पष्टीकरणासाठी ज्ञानदेव सुंदर दृष्टान्त-मालिका मांडतात. ‘अमृताच्या दृष्टीने जरी सारखे सातेरे (सात दिवस वृष्टी) लागले तरी त्याला कोणी कंटाळेल काय? सुखाचे कोट्यवधी दिवस गेले, तरी ते मोजत बसून कोणी कंटाळा करेल काय? पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे चांदण्यांच्या एक युगभर जरी रात्री गेल्या तरी चकोर पक्षी चंद्राकडे पाहण्यास कंटाळतील काय? त्याप्रमाणे ज्ञानाविषयी तुझ्यासारखा रसाळ वर्णन करणारा भेटल्यावर, ते ऐकण्याचा कोण कंटाळा करील?’ श्रीकृष्णांनी अर्जुनाला अगाध ज्ञान देणं, ज्ञानदेवांनी ते रसाळतेनं सांगणं, श्रोत्यांनी मन लावून ऐकणं असा हा समसमा संयोग. असे तरल दाखले देणारे ज्ञानदेव कवित्वाचा कळसच आहेत. विशेष म्हणजे त्यांची चित्रमय पद्धती आणि विनोदाची फोडणी.





