एकाचवेळी तीस महिलांचे दागिने लंपास

Contributed byदेवळा|महाराष्ट्र टाइम्स

देवळा येथील दुर्गामाता यात्रोत्सवात गर्दीचा गैरफायदा घेत सुमारे २५ ते ३० महिलांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. पोलिसांनी एका संशयित महिला आणि एका पुरुषाला ताब्यात घेतले आहे. चोरीला गेलेले दागिने परत मिळवून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यात्रेदरम्यान पोलिसांचा बंदोबस्त अपुरा असल्याचेही बोलले जात आहे.

एकाचवेळी तीस महिलांचे दागिने लंपास
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

देवळा येथील दुर्गामाता यात्रोत्सवात रविवारी (दि. १९) सायंकाळी उशिरा गर्दीचा फायदा घेत जवळपास २५ ते ३० महिलांच्या गळ्यातील मणी-मंगळसूत्र व सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली. या प्रकारामुळे नागरिकांत मोठा असंतोष पसरला असून, देवळा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी महिलांची मोठी गर्दी झाली होती. तक्रारींची पुरेशी दखल घेतली जात नसल्याचा आरोप करीत महिलांनी संताप व्यक्त केला.

यात्रोत्सवात दर्शनासाठी देवळा शहरासह तालुक्यातील मोठ्या संख्येने महिला आल्या होत्या. याच गर्दीत चोरट्यांनी सुमारे २६ महिलांचे चार ग्रॅमपासून एक तोळ्यापर्यंत वजनाचे दागिने लंपास केल्याचे समोर आले. सोन्याचे वाढते दर लक्षात घेता चोरट्यांनी खास सोन्याच्या दागिन्यांवर डोळा ठेवला असल्याची चर्चा आहे. या प्रकरणी संशयित एक महिला व एका पुरुषाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, देवळ्यात आठवडे बाजाराच्या दिवशीही दागिने व मोबाइल चोरीच्या तक्रारी वाढत असल्याचे नागरिकांनी सांगितले. यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त नसल्याचा आरोप महिलांनी केला. चोरीस गेलेले दागिने परत मिळवून द्यावेत, तसेच चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.