युद्धसमाप्तीसाठी ट्रम्प यांच्यावर दबाव

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर इराणसोबतचे युद्ध संपवण्यासाठी संसदीय दबाव वाढत आहे. इराणचे चलन रियाल डॉलरच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घसरले आहे. अमेरिकेच्या युद्धाधिकार ठरावानुसार ट्रम्प यांना युद्ध थांबवण्यासाठी ६० दिवसांची मुदत आहे. या मुदतीचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी युद्धामुळे पाकिस्तानच्या आर्थिक प्रगतीला फटका बसल्याचे म्हटले आहे.

युद्धसमाप्तीसाठी ट्रम्प यांच्यावर दबाव

तेहरान : अमेरिका-इस्रायलसोबतच्या शांतता चर्चेतील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर इराणचे चलन रियाल बुधवारी गडगडले. एका अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रियालचे मूल्य मूल्य १.८ दशलक्ष इतके नोंदले गेले. दोन महिन्यांपूर्वी, २८ फेब्रुवारीला युद्ध सुरू झाले तेव्हापासून रियाल स्थिर होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून रियाल कमकुवत होण्याचे सत्र सुरू झाले. बुधवारी रियालने नीचांक नोंदवला. यामुळे देशातील महागार्ठत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इराणसोबतच्या शांतता चर्चेला खीळ बसली असताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर युद्धसमाप्तीचा संसदीय दबाव निर्माण झाला आहे. अमेरिकी कायद्यानुसार ट्रम्प यांना युद्धसमाप्तीसाठी ६० दिवसांची मुदत पाळावी लागणार असून, तिचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

अमेरिकेचा युद्धाधिकार ठराव १९७३ मध्ये तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या काळात संसदेत मंजूर करण्यात आला होता. या ठरावाच्या कलम ४नुसार, अमेरिकी सैन्य शत्रूदेशात पाठवल्यानंतर ४८ तासांत अध्यक्षांनी आपल्या कृतीच्या समर्थनार्थ घटनात्मक आणि कायदेशीर अधिकारांबाबत संसदेत स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. युद्धाधिकार ठरावानुसार, अमेरिकेचे अध्यक्ष संसदेच्या मंजुरीविना केवळ ६० दिवस युद्ध चालवू शकतात. सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धबंदी असली तरी इराणच्या बंदरांच्या कोंडीसाठी नौसैनिक आणि युद्धनौका तैनात असल्याने युद्ध कालावधीवरील मर्यादेचा हा ठराव लागू असेल.

या साठ दिवसांच्या कालावधीत अमेरिकी संसदेने युद्धास मंजुरी दिली नाही किंवा मुदतवाढ दिली नाही तर अध्यक्षांना युद्धबंदी करणे आवश्यक ठरते. ट्रम्प यांनी इराण युद्धाबाबतचा अहवाल दोन मार्च रोजी सादर केला होता. म्हणजे युद्धसमाप्तीची मुदत एक मे रोजी संपत आहे. अमेरिकी संसद युद्धसमाप्तीसाठीची मुदत कमाल ३० दिवसांनी वाढवू शकेल. मात्र, त्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मतदान आवश्यक ठरेल. ट्रम्प यांनी या ठरावाचे उल्लंघन केल्यास त्यांना कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

दरम्यान, ट्रम्प हे इराणची कोंडी करून शरण यायला भाग पाडत आहेत आणि इराणमध्ये अंतर्गत अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप इराणने केला आहे. इराणचा शांतता प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळल्याने इराणची कोंडी झाल्याचे मानले जाते.

‘युद्धामुळे पाकला फटका’

इस्लामाबाद : ‘अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे गेल्या दोन वर्षांत पाकिस्तानने केलेल्या आर्थिक प्रगतीला फटका बसला बसला आहे,’ असे प्रतिपादन पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बुधवारी केले. पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपले सरकार प्रयत्नशील राहील, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. शरीफ यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेतला.