बंद खाती सक्रिय होणार

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीचे (ईपीएफ) जुने खाते आता सहज शोधता येणार आहे. ईपीएफओ लवकरच एक नवीन वेबपोर्टल सुरू करत आहे. या पोर्टलमुळे निष्क्रिय खाती पुन्हा सक्रिय करणे सोपे होईल. ज्या सदस्यांकडे युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) नाही, त्यांनाही याचा फायदा होईल. आधार-आधारित प्रमाणीकरणामुळे जुन्या खात्यांपर्यंत पोहोचणे शक्य होईल. यामुळे सदस्यांना त्यांचे भविष्यनिर्वाह निधी खाते अद्ययावत करता येईल.

बंद खाती सक्रिय होणार

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी चे (ईपीएफ) जुने खाते वापराविना पडून असेल किंवा ते सध्या निष्क्रिय असेल, तर त्याचा आता शोध घेणे; तसेच ते पुन्हा वापरात आणणे सोपे होणार आहे. यासाठी कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) लवकरच वेबपोर्टल सुरू करणार आहे.

यामुळे सदस्यांना त्यांचे जुने आणि निष्क्रिय भविष्यनिर्वाह निधी खाते शोधणे आणि ते पुन्हा सक्रिय करणे सोपे होईल, अशी माहिती कामगार आणि रोजगारमंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी दिली.

‘एम्प्लॉइ प्रॉव्हिडंट फंड आधार बेस्ड ॲक्सेस पोर्टल फॉर ट्रॅकिंग इनऑपरेटिव्ह अकाउन्ट्स’ अर्थात ‘ई-प्राप्ती’ असे या पोर्टलचे नाव आहे. हे पोर्टल आधार-आधारित प्रमाणीकरण यंत्रणा ‘ईपीएफओ’ सदस्याला देईल. याद्वारे ज्या सदस्यांकडे ‘यूएएन’ (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) नाही, अशा जुन्या ‘ईपीएफ’ खात्यांपर्यंत पोहोचणे आणि ‘यूएएन’ लिंक करून प्रोफाइल अद्ययावत करणे शक्य होईल, असे मांडविया यांनी सांगितले.

‘यूएएन’चा वापर

‘ईपीएफओ’ने सन २०१४ पासून सदस्याला १२-अंकी युनिक आयडी किंवा ‘यूएएन’ देण्यास सुरुवात केली. ‘ई-प्राप्ती’ हे पोर्टल सुरक्षित आणि कार्यक्षम अंमलबजावणीसाठी सुरुवातीच्या टप्प्यात ‘मेंबर आयडी’वर आधारित असेल.