रायन रिक्लटनच्या शतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ५ बाद २४३ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे ‘मुंबई’च्या चाहत्यांना विजयाची आशा निर्माण झाली होती. मात्र, फलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या मैदानावर ट्रेव्हिस हेड आणि हेन्रिच क्लासेन यांच्या आक्रमक अर्धशतकांच्या जोरावर ‘हैदराबाद’ने लढत सहा विकेट आणि आठ चेंडू राखून जिंकली. त्यामुळे घरच्या मैदानावर ‘मुंबई’चा हा पाचव्या लढतीतील चौथा पराभव ठरला.
वानखेडे स्टेडियमवर ही लढत झाली. लक्ष्याचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा आणि हेडने ८.४ षटकांत १२९ धावांची सलामी देऊन विजयाचा पाया रचला. घझनफारने सलग दोन चेंडूंवर अभिषेक आणि ईशान किशनला बाद केले. यानंतर पुढच्याच षटकात हार्दिक पंड्याने हेडचा अडसर दूर केला. या वेळी ‘मुंबई’ पुनरागमन करील, असे वाटत होते. मात्र, क्लासेनने आपला ‘क्लास’ दाखविला. त्याला रोखण्यात ‘मुंबई’चे गोलंदाज कमी पडले. त्याने नितीशकुमार रेड्डीसह ४० चेंडूंत ८०, तर अरोरासह १४ चेंडूंत ३६ धावांची अभेद्य भागीदारी रचून ‘हैदराबाद’च्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, ‘मुंबई’ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. विल जॅक्स आणि रायन रिक्लटन यांनी सुरुवातीपासूनच आक्रमण सुरू केले. यंदाच्या मोसमात ‘मुंबई’कडून अशी आक्रमकता पहिल्यांदाच बघायला मिळाली. या जोडीने ‘पॉवरप्ले’मध्ये बिनबाद ७८ धावा चोपल्या. या जोडीने ७.१ षटकांत ९३ धावांची सलामी दिली. जॅक्स बाद झाल्यावर सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा निराशा केली. मात्र, रिक्लटनच्या फलंदाजीवर याचा कुठलाच परिणाम झाला नाही. पॅट कमिन्ससारख्या कसलेल्या गोलंदाजाचेही त्याने दडपण घेतले नाही. ‘मुंबई’ने १६व्या षटकापर्यंत ३ बाद २०२ अशी मजल मारली होती. यानंतर अखेरच्या २४ चेंडूंत ४१ धावांची बरसात झाल्याने ‘मुंबई’ला आव्हानात्मक धावसंख्या रचता आली. रिक्लटनने हार्दिक पंड्यासह २७ चेंडूंत ५६ धावा जोडल्या.
सलामीच्या लढतीत ‘कोलकाता’विरुद्ध ८१ धावांची खेळी करणारा रिकल्टनने यानंतर चारपैकी तीन डावांत एकेरी धावाच केल्या होत्या. त्यामुळे त्याच्याऐवजी क्विंटन डीकॉकला संधी देण्यात आली. डीकॉक जायबंदी झाल्याने पुन्हा मिळालेल्या संधीचे रिकल्टनने सोने केले.
सोमवारीच केलेला सराव, मंगळवारी क्षेत्ररक्षण आणि इतर व्यायाम प्रकारात घेतलेला पुढाकार यामुळे मुंबई इंडियन्सच्या कट्टर पाठीराख्यांचा ‘मुंबईचा राजा’ म्हणजेच रोहित शर्मा बुधवारी वानखेडेवरील ‘हैदराबाद’विरुद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता होती. मात्र, ‘रोहितला पुनरागमनासाठी आणखी थोडे दिवस द्यावे लागतील,’ असे कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेकीच्या वेळी सांगितल्यावर उपस्थित पाठीराख्यांमध्ये नाराजी पसरली.
संक्षिप्त धावफलक : मुंबई इंडियन्स - २० षटकांत ५ बाद २४३ (विल जॅक्स ४६ - २२ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकार, रायन रिकल्टन नाबाद १२३ - ५५ चेंडूंत १० चौकार व ८ षटकार, सूर्यकुमार यादव ५, नमन धीर २२ - १७ चेंडूंत ३ चौकार, हार्दिक पंड्या ३१ - १५ चेंडूंत २ चौकार व २ षटकार, तिलक वर्मा ७, प्रफुल हिंगे ४-०-५४-२, इशान मलिंगा ४-०-२९-१, साकिब हुसेन ३-०-३९-१, नितीशकुमार रेड्डी २-०-३१-१) पराभूत वि. सनराझर्स हैदराबाद - १८.४ षटकांत ४ बाद २४९ (अभिषेक शर्मा ४५ - २४ चेंडू, ४ चौकार, ३ षटकार, ट्रेव्हिस हेड ७६, ३० चेंडूंत, ८ षटकार व ४ चौकार, ईशान किशन ०, हेन्रिच क्लासेन नाबाद ६५, ३० चेंडूंत, ७ चौकार व ४ षटकार, नितीशकुमार रेड्डी २१, १७ चेंडूंत तीन चौकार, सलिल अरोरा नाबाद ३०, १० चेंडूंत, ३ षटकार व दोन चौकार, ट्रेंट बोल्ट ४-०-४१-१, जसप्रीत बुमराह ४-०-५४-० घझनफार ४-०-५१-२, हार्दिक पंड्या ३.४-०-३९-१).







