मुंबई : डॉलरच्या तुलनेत बुधवारी रुपया १४ पैशांनी घसरून ९४.८२ या आजवरच्या सार्वकालीन नीचांकी स्तराजवळ बंद झाला. प्रतिबॅरल ११५ डॉलरच्या आसपास पोहोचलेले ब्रेंट क्रूड आणि देशाबाहेर जाणारे परदेशी भांडवल यामुळे रुपयावर दबाव निर्माण झाला.
आंतरबँक परकीय चलन बाजारात रुपया डॉलरच्या तुलनेत ९४.७९ वर उघडला. त्यानंतर तो आणखी घसरून ९४.८६ या दिवसाच्या नीचांकी स्तरावर पोहोचला आणि अखेर ९४.८२वर स्थिरावला. मंगळवारच्या तुलनेत ही १४ पैशांची घसरण आहे.
डॉलर निर्देशांक ०.०८ टक्क्यांनी वाढून ९८.७२ वर पोहोचला. जागतिक तेल बाजारात ब्रेन्ट क्रूडचा वायदा दर प्रतिबॅरल ३.१३ टक्क्यांनी वधारून ११४.७४ डॉलरवर पोहोचला. मंगळवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी २,१०३.७४ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.
भारताचा औद्योगिक विकास दर मार्चमध्ये पाच महिन्यांच्या नीचांकी ४.१ टक्क्यांवर आला. मार्च २०२५ मध्ये हा दर ३.९ टक्के होता.







