क्रेडिट कार्डच्या पेमेंटला मुदतवाढ

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आता क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना दिलासा मिळणार आहे. पेमेंटची अंतिम तारीख उलटून गेल्यानंतरही तीन दिवसांची मुदतवाढ मिळेल. यामुळे दंड आकारला जाणार नाही आणि सिबिल स्कोअरवरही परिणाम होणार नाही. हा नवा नियम १ एप्रिल २०२७ पासून लागू होईल. रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्व बँका आणि वित्तीय संस्थांसाठी नियम समान होतील.

क्रेडिट कार्डच्या पेमेंटला मुदतवाढ

क्रेडिट कार्ड वापरून खरेदी केल्यानंतर त्याचे पेमेंट ठरावीक तारखेला न केल्यास बँकेकडून दंड आकारण्यात येतो; शिवाय कार्डधारकाचा पतगुणांक ( सिबिल स्कोअर ) घसरण्याची भीतीही असते. मात्र, रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमानुसार आता तसे होणार नाही.

रिझर्व्ह बँकेने क्रेडिट कार्डधारकांना दिलासा देताना पेमेंटच्या अंतिम तारखेपर्यंत रक्कम भरता आली नाही तरी त्यासाठी आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देऊ केली आहे. हा नवा नियम एक एप्रिल २०२७पासून लागू होणार आहे.

तीन दिवसांची मुदतवाढ देण्याचा नियम ‘आरबीआय (कमर्शियल बँक्स क्रेडिट कार्ड अँड डेबिट कार्ड इश्युअन्स अँड कंडक्ट) अमेंडमेंट डायरेक्शन्स, २०२६’ अंतर्गत लागू केला जाणार आहे. सध्या बँका, वित्तसंस्था क्रेडिट कार्डधारकांकडून पेमेंटमध्ये होणाऱ्या विलंबाचा अहवाल रिझर्व्ह बँकेकडे सादर करतात. यामध्ये विलंबशुल्काचा उल्लेख असतो. मात्र, असे करताना प्रत्येक बँक आणि वित्तसंस्था वेगवेगळ्या स्वरूपात अहवाल सादर करताना दिसतात. त्यामुळे वरील नियमांतर्गत याचे प्रमाणीकरण रिझर्व्ह बँकेने केले आहे.