‘इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत लवकरच राजनैतिक तोडगा निघाला नाही, तर अमेरिका अधिक कठोर भूमिका घेईल,’ असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिला आहे.
ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया मंचावर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ते हातात असॉल्ट रायफल घेतलेले दिसतात. त्यावर ‘नो मोर मिस्टर नाईस गाय’ असा संदेश लिहिलेला आहे.
चर्चेच्या संथ गतीबद्दल ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘इराणला स्वतःची परिस्थिती सुधारता येत नाही. इराणच्या नेतृत्वाला अण्वस्त्रमुक्त करारावर स्वाक्षरी कशी करायची, हेच समजत नाही,’ असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
प्रादेशिक तणाव वाढलेला असताना आणि राजनैतिक चर्चा ठप्प झालेली असताना ट्रम्प यांनी हे विधान केले आहे. ‘त्यांनी लवकर शहाणे झालेले बरे,’ असे ट्रम्प यांनी लिहिले आहे. अमेरिकेने मांडलेल्या अटींना इराणने विरोध कायम ठेवला, तर अमेरिका अधिक आक्रमक धोरण अवलंबण्याची शक्यता या पोस्टमधून सूचित होत आहे.
जुन्या करारांना अपुरे मानून, जागतिक सुरक्षेसाठी ट्रम्प यांनी ‘ट्रम्प करार’ नावाचा नवीन करार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जोपर्यंत अण्वस्त्रांच्या मुद्द्यावर थेट चर्चा होत नाही, तोपर्यंत अमेरिका वाटाघाटी पुढे नेणार नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
दरम्यान, इराणने दिलेला प्रस्ताव ट्रम्प यांना अमान्य असल्याचे सांगण्यात येते.







