Remembrance Day Of Indias Partition Pain A Message Of Unity And Humanity
सद् भावना बळकट करूया!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नवी दिल्ली : ‘१४ ऑगस्ट हा दिवस इतिहासातील सर्वांत क्रूर अध्यायांपैकी एका अध्यायाचा साक्षीदार आहे. देशाच्या फाळणीची जखम ही काँग्रेसची देणगी आहे. ही गोष्ट इतिहास कधीही विसरणार नाही,’ अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी एक्सवर भावना व्यक्त केली. ‘१४ ऑगस्ट १९४७ हा दिवस इतिहासातील सर्वांत क्रूर अध्यायांपैकी एका अध्यायाचा साक्षीदार आहे. या काळात लाखो नागरिकांना अमानुष यातना सहन करत प्राण गमवावे लागले, तर कोट्यवधी नागरिकांना आपली घरे, संपत्ती आणि प्रियजन सोडून विस्थापित व्हावे लागले. फाळणीत जीव गमावलेल्यांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो,’ असेही त्यांनी नमूद केले.
‘देशाच्या फाळणीमुळे ज्यांना दु:ख, वेदना सोसाव्या लागल्या, त्या सर्वांच्या धैर्याचे आपण आज स्मरण करत आहोत,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ‘एक्स’वरून फाळणीग्रस्तांना श्रद्धांजली वाहिली. सद्भावना आणि एकतेची राष्ट्रीय भावना आपण आणखी बळकट करूया, असे आवाहन केले. देशाच्या फाळणीनंतर उसळलेल्या दंगलींमध्ये आणि त्यानंतरच्या स्थलांतरात ज्यांनी प्राण गमावले, त्यांच्या स्मरणार्थ मोदी सरकारतर्फे २०२१ पासून १४ ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी वेदना स्मृतिदिन’ म्हणून पाळला जातो. यानिमित्त मोदी म्हणाले, आपण फाळणी वेदना स्मृतिदिन पाळत आहोत. फाळणीचा फटका बसलेल्या सर्वांच्या धैर्याचे आपण स्मरण करतो. इतिहासातील तो असा क्षण होता, ज्याने अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. असंख्य कुटुंबे विस्थापित झाली, प्रियजन गमावले गेले आणि अपरिमित दु:ख सहन करावे लागले. हा दिवस आपल्या देशात सलोखा आणि बंधुभाव जपण्याचा आपला संकल्प अधिक दृढ करो आणि ‘विकसित भारत’ उभारण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करूया,’ असे आवाहन त्यांनी केले.
भारताचे सौजन्य म्हणजे
दुर्बलता नव्हे : डोवाल
‘भारताचे सौजन्य आणि सहनशीलता म्हणजे दुर्बलता, असा अर्थ कोणी लावू नये. आम्ही प्रसंगी परिणामांची पर्वा न करता कोणतीही जोखीम पत्करून शत्रूवर कठोर प्रहार करू शकतो, हे आम्ही ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून दाखवून दिले,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी शुक्रवारी केले. डिस्कव्हरीच्या ‘डीक्लासिफाइड : ऑपरेशन सिंदूर’ या आगामी डॉक्युसिरीजच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
‘पहलगाम हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या शत्रूंच्या छावण्या उद्ध्वस्त करणे हे ८८ तास चाललेल्या या लष्करी कारवाईचे उद्दिष्ट होते,’ असे ते म्हणाले. लष्कराच्या या मोहिमेविषयी डोवाल यांनी प्रथमच भाष्य केले आहे.
‘या लष्करी कारवाईतून आम्ही जगाला अतिशय स्पष्ट संदेश दिला. ा भारत कोणताही धोका पत्करू शकतो; भारत कठोर प्रहार करू शकतो,’ असे डोवाल म्हणाले.