ना परवाना, ना परवानगी

महाराष्ट्र टाइम्स
ना परवाना, ना परवानगी
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेल्या धडक कारवायांची धास्ती घेऊन जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयाच्या कॅण्टीनचालकाने पळ काढला आहे. या कॅण्टीन चालकानेच एफडीए प्रशासनाला पत्र देत आवश्यक परवान्याअभावी कॅण्टीनसेवा बंद करत असल्याचे कळवले आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’कडे असलेल्या माहितीनुसार, या कॅण्टीनचे कंत्राट २०२३मध्येच संपुष्टात आले होते. मात्र त्यानंतर कॅण्टीन कसे सुरू राहिले, असा प्रश्न आहे.

सुमारे एक हजार चौरस फुटांच्या जागेवर संबंधित कंत्राटदाराकडून कॅण्टीन चालवण्यात येत होते. या कराराची मुदत संपल्यानंतरही इथे कॅण्टीन सुरू ठेवण्यात आले होते. जागेचे भाडे, वीज आणि पाणीबिलांची थकबाकी असल्याचेही कळते. या कॅण्टीन चालकाने एफएसएसआयए परवाना, अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र तसेच आरोग्य विभागाची संमती नसल्याचे स्वतःच एफडीएला कळवले आहे. त्यानंतर कारवाईच्या भीतीने त्याने सेवा बंद करून जागा सोडल्याची खात्रीदायक माहिती मिळाली आहे.
काही महिन्यांपूर्वी एफडीएकडे याच कॅण्टीनसंदर्भात तक्रार करण्यात आली होती. त्यात १९ मे २०२६ रोजी एफडीएकडून देण्यात आलेल्या उत्तरामध्ये संबधित कंत्राटदाराकडे २९ जानेवारी २०२९ पर्यंत वैध एफएसएसएआय परवाना असल्याचे नमूद केले होते. या परवान्याचा क्रमांक ११५२०००५००००४४ असा देण्यात आला होता. मात्र, आता कंत्राटदाराने परवाना नसल्याचे मान्य केले असून हा परवाना कोणत्या आस्थापनेसाठी दिला होता, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.