‘महाडीबीटी’वर २९ नवीन योजनांसह १०५ योजना

महाराष्ट्र टाइम्स
launch of 29 new schemes on mahadbt portal total 105 schemes now
‘राज्यातील नागरिकांना विविध वैयक्तिक योजनांचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने मिळावा, यासाठी महाडीबीटी पोर्टलवर आज नव्याने २९ योजनांचे लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे महाडीबीटीवर उपलब्ध योजनांची संख्या आता १०५ झाली आहे. सरकारच्या उर्वरित सर्व योजनाही टप्प्याटप्प्याने या एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न असून, त्याद्वारे नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सोपे होईल’, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

महाडीबीटीची व्यवस्था सुरू झाल्यापासून सरकारच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढले असून, योजनांचा गैरवापर लक्षणीयरित्या कमी झाला आहे, असे त्यांनी नमूद केले. सह्याद्री अतिथीगृह येथे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने २९ योजनांच्या लोकार्पण कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
‘सरकारच्या ‘सेकंड जनरेशन रिफॉर्म्स’अंतर्गत महाडीबीटी व्यवस्था अधिक सक्षम, कार्यक्षम आणि विश्वासार्ह करण्याचे काम सुरू आहे. विविध विभागांच्या योजनांचे टप्प्याटप्प्याने लोकार्पण करण्यात येत असून, भविष्यात सर्व प्रमुख योजना या डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये किंवा पोर्टलवर जाण्याची आवश्यकता कमी होऊन सेवा वितरण अधिक सुलभ होईल’, असेही त्यांनी सांगितले.