‘बौद्धिक नक्षलीं’पासून सावधान

महाराष्ट्र टाइम्स
‘बौद्धिक नक्षलीं’पासून सावधान
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शनिवारी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा अधोरेखित केला. ‘सशस्त्र नक्षलवादाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी झाला असला, तरी ‘ बौद्धिक नक्षलीं ’च्या वैचारिक आव्हानापासून सावध राहा,’ असे आवाहन त्यांनी देशवासींना केले. याचवेळी त्यांनी विकसित, आत्मनिर्भर भारतासाठी ‘शक्तीची सप्तधारा’ या संकल्पनेची घोषणा करत उत्पादन, शेती, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, संरक्षण, हरित अर्थव्यवस्था आणि सॉफ्ट पॉवर या सात क्षेत्रांच्या बळकटीकरणावर भर दिला.

‘जंगलांमध्ये सक्रिय असलेला सशस्त्र नक्षलवाद कमकुवत झाला असला, तरी त्यामागची वैचारिक प्रवृत्ती संपलेली नाही. नक्षलवादी विचारसरणीच्या व्यक्ती अनेक वर्षांपासून देशातील सत्ताकेंद्रांमध्ये, सरकारी समित्यांमध्ये सल्लागाराच्या भूमिकेत राहून धोरणांवर प्रभाव टाकत होत्या. त्यामुळे देशाने या छुप्या वैचारिक आव्हानाबाबत सजग राहण्याची गरज आहे. देशवासी आणि विशेषतः तरुणांनी अशा वैचारिक अराजकतेला ओळखावे, तिला समाजापासून विलग करावे,’ असे नरेंद्र मोदी म्हणाले. ‘विकसित भारताच्या उभारणीच्या मुख्य प्रवाहात तरुणांना समाविष्ट केले पाहिजे. सुरक्षित भारताची उभारणी करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आव्हान सीमेच्या आत असो, अथवा सीमेबाहेर, भारत प्रत्येक परिस्थितीसाठी सज्ज आहे,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘भारताने उदात्त संकल्प केले आहेत. ते पूर्ण करण्यासाठी सरकार परिश्रम घेत असताना त्यात विघ्न आणून नकारात्मक विचार पसरविण्याचे उद्योगही वेळोवेळी झाले,’ असा आरोप मोदी यांनी काँग्रेससह विरोधकांवर केला.

देशात मोठे आणि आधुनिक नागरी संरक्षण स्वयंसेवक दल उभे करण्याचीही घोषणा पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केली. ‘संकट आले की, सरकार सर्व काही करेल, या मानसिकतेऐवजी समाजातील प्रशिक्षित नागरिकही बचावकार्यात सहभागी होतील, असा त्याचा गाभा आहे,’ असे त्यांनी नमूद केले.

‘नशामुक्तीसाठी सामूहिक प्रयत्न हवेत’... १२