‘हंगेरीत बस अपघात; १२ ठार, १० जखमी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
‘हंगेरीत बस अपघात; १२ ठार, १० जखमी
बुडापेस्ट : हंगेरीतील एका महामार्गावर रविवारी मध्यरात्री प्रवासी बस एका खड्ड्यात पडून पलटी झाली. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला असून, काही प्रवासी जखमी झाले आहेत. पोलिश पर्यटकांना घेऊन जात असलेली ही बस मेझोकेरेस्तेस शहराजवळ पूर्वेकडे जाणाऱ्या मार्गिकांवरून प्रवास करत होती. हंगेरीची राजधानी बुडापेस्टच्या पूर्वेस सुमारे १४० किलोमीटरवर एम-३ महामार्गावर मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास बसला अपघात झाला. यात एकूण ५७ प्रवासी आणि दोन चालक होते.

तीन विद्यार्थिनी ठार
वर्धा : वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाटमधील शाळेजवळ ट्रॅव्हल्सने धडक दिल्याने दुचाकीवरील तीन विद्यार्थिनींचा जागीच मृत्यू झाला. ही घटना स्वातंत्र्यदिनी; सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. समृद्धी रुपक धामसे (वय १५), आरोही राजू चवरे (वय १७) आणि मिसबा जावेद शेख (वय १७) सर्व राहणार हिंगणघाट अशी मृतांची नावे आहेत. या तिन्ही विद्यार्थिनी दुचाकीवरून जात असताना ट्रॅव्हल्सने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली.

विद्यार्थ्याचा मृत्यू

कोची : अभियांत्रिकी कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मिची मार्पू (वय २०, रा. नाहरलागुन, अरुणाचल प्रदेश) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो कोठमंगलमजवळील एका भाड्याच्या खोलीत राहत होता.

सोने तस्करी पकडली

इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूर येथे ४.७२ कोटी रुपये किमतीचे तीन किलो सोने घेऊन जाणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. या कारवाईदरम्यान झालेल्या झटापटीत ‘डीआरआय’चे दोन अधिकारी जखमी झाले.आरोपी महाराष्ट्रातील अकोल्याहून कारने इंदूरला तस्करीचे सोने पोहोचवण्यासाठी जात होते. अधिकाऱ्यांनी गाडी थांबवण्यास सांगितल्यानंतरही तस्करांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.

संघटनांत चकमक

हैदराबाद : हैदराबादमधील ‘इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस युनिव्हर्सिटी’ कॅम्पसमध्ये ‘अभाविप’ आणि ‘एनयुएसआय’ विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये १४ ऑगस्ट रोजी जोरदार संघर्ष झाला. या घटनेत किमान सात विद्यार्थी जखमी झाले असून, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. घटनेच्या आधी एक दिवस महिला वसतिगृहात दोन विद्यार्थी गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता, ज्यातून हा संघर्ष झाल्याचे सांगितले जात आहे.

बहिणींचा बुडून मृत्यू

पंचवटी : मेरी लिंक रोडवरील मानेनगर (शुभम कॉलनी) परिसरात घराच्या गॅलरीतील पाण्याच्या टाकीत पडून दोन सख्ख्या चिमुरड्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी (दि. १५) रात्री घडली. तृप्ती विशाल सोनवणे (वय ८) आणि स्वस्ति विशाल सोनवणे (वय ६) अशी मृत बहिणींची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.