कांद्यावरील निर्यातबंदी हटवा

Contributed byनिफाड|महाराष्ट्र टाइम्स
unity of agricultural producers demanding the lifting of onion export ban
कांद्याच्या बाजारभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातबंदी, निर्यात शुल्क किंवा अन्य कोणतेही निर्बंध लादू नयेत, या प्रमुख मागणीसाठी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शनिवारी कांदा परिषद घेण्यात आली. परिषदेत कांदा उत्पादकांच्या विविध प्रश्नांवर आठ ठराव बहुमताने मंजूर करण्यात आले.

शासकीय कांदा खरेदी-विक्रीच्या धोरणामुळे कांदा उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. ‘नाफेड’च्या खरेदी प्रक्रियेबाबतही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, शिवा सुराशे, शेतकरी संघटनेचे बोराडे, ललित दरेकर यांच्यासह कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास जंतर-मंतरवर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
..हे आहेत ठराव

कांद्याला प्रतिक्विंटल दोन हजार रुपये भावांतर योजना लागू करावी, ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’मार्फत होणारी खरेदी बंद करावी, शासनाने खरेदी केलेला कांदा परदेशात विक्री न करता देशांतर्गत बाजारपेठेत योग्य नियोजनाने विकावा, तसेच पूर्वीप्रमाणे १० टक्के निर्यात अनुदान द्यावे, आदी ठरावांचा समावेश आहे.