उपवर्गीकरण आम्हाला नको!

Contributed byमालेगाव|महाराष्ट्र टाइम्स
उपवर्गीकरण आम्हाला नको!
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात रविवारी (दि. २३) मालेगाव येथे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली धडक महामोर्चा काढण्यात आला. उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घ्यावा, अनुसूचित जातींचे आरक्षण अबाधित ठेवावे आणि माजी न्यायाधीश अनंत बदर समितीचा अहवाल रद्द करावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून दुपारी १ वाजता मोर्चाला प्रारंभ झाला. कॅम्प रोडमार्गे एकात्मता चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन घोषणाबाजी केली. मोर्चानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या सभेत आंबेडकर यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली. ‘उपवर्गीकरणाच्या विरोधात संपूर्ण राज्यात आंदोलन उभारले जात आहे. मातंग समाज आमच्यासोबत आहे. सरकार जबरदस्तीने उपवर्गीकरणाचा घाट घालत आहे. सरकारचे एकंदरीत राजकारण पाहिले, तर समाजासमाजामध्ये भांडणे लावण्याचे काम केले जात आहे. एससी समाज एक आहे,’ असे आंबेडकर म्हणाले.

मोर्चाला माजी मंत्री बबनराव घोलप, ॲड. अमन आंबेडकर, रुख्मिणी लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. ॲड. आकाश सुरवाडे यांनी प्रास्ताविक केले. अनुसूचित जातींचे घटनात्मक हक्क, तसेच शिक्षण, नोकरी आणि राजकीय प्रतिनिधित्वातील अधिकार सुरक्षित ठेवण्याची मागणीही करण्यात आली. मोर्चात पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

उपवर्गीकरण आम्हाला नको!