55 Tmc Water Discharge In Jayakwadi Impact Of Gangapur And Palkhed Dams
जायकवाडीत पोहोचले ५५ टीएमसी पाणी
Contributed by: नाशिक|महाराष्ट्र टाइम्स•
पावसाचा जोर कमी झाल्याचा प्रत्यय येत असला तरी गंगापूर आणि पालखेड धरण समूहातील अनेक धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने काही दिवसांपासून विसर्ग सुरूच आहे. गेल्या दोन अडीच महिन्यांत जिल्ह्यातून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात सुमारे ५५ टीएमसी पाणी गेल्याची माहिती प्रशासनाने दिली. विशेष म्हणजे विसर्ग सुरूच असल्याने जायकवाडीतील पाणीसाठा आणखी वाढणार आहे.
पावसाळा सुरू होऊन पावणे तीन महिने पूर्ण झाले. या कालावधीत अनेक दिवस पावसाशिवाय कोरडे गेले, तर काही दिवस जोरदार पाऊस झाला. विशेषत: धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जुलै आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली. यातून एक दोन वेळा पूरस्थितीही निर्माण झाली. यंदाच्या हंगामात गंगापूर आणि पालखेड समूहातील अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, तो सुरूच आहे. गोदावरी, दारणा आणि तिच्या उपनद्यांमधील पाणी नांदूरमध्यमेश्वर बंधारामार्गे छत्रपती संभाजीनगरमधील पैठण येथील नाथसागर अर्थात जायकवाडी धरणात पोहोचते आहे. आतापर्यंत ५४ हजार ८७४ दशलक्ष घनफुट म्हणजेच सुमारे ५५ टीमसी पाणी जायकवाडीत पोहोचल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. इगतपुरी तालुका पाणलोट क्षेत्र असणाऱ्या दारणा धरणातून सर्वाधिक पाणी जायकवाडीकडे वाहून गेले आहे.