Transformation Of Youth In China Through Haircut Reformation
लांब केस, तंग तुमानी यांवर चीनमध्ये संक्रांत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
पेकिंग, वि. २३ (रॉय.) - कम्युनिस्ट चीनच्या राजधानीत लांब केस राखणाऱ्या तरुणांचे केस जाहीरपणे कापून कमी केले जात आहेत. सांस्कृतिक क्रांतीचे 'लाल रक्षक' असणारी विशीतली मुले या मोहिमेवर कडक देखरेख ठेवीत आहेत. तंग तुमानी पाश्चात्य असल्याने त्यावरही संक्रांत आली आहे.
माओ त्से-तुंगने सामान्य माणसास सांगितलेल्या तत्त्वज्ञानाच्या प्रसाराची मोहीम शाळकरी मुलांनी उघडली असून गेल्या तीन दिवसात त्यांनी शहरातील सर्व भितींवर भित्तिपत्रके चिकटवन टाकली आहेत. ज्या स्त्रियांनी आपले केस कुरळे करून घेतले होते, त्या आता ते धुवून सरळ करीत आहेत. सामुदायिक स्नानगृहांतून मालीश वगैरे प्रकारांना बंदी करण्यात आली असून स्नानगृहात येणाऱ्यांबाबत पंक्तिप्रपंच करण्याचा आदेश तेथील व्यवस्थापकांना देण्यात आला आहे.(२४ ऑगस्ट १९६६)