देशासाठी योगदान देणे हे भाग्यच

महाराष्ट्र टाइम्स
देशासाठी योगदान देणे हे भाग्यच
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
‘देशाच्या स्वदेशी तंत्रज्ञान विकास व विज्ञान क्षेत्राच्या माध्यमातून मी माझ्या देशासाठी योगदान देऊ शकले, याचा अभिमान आहे,’ असे प्रतिपादन एरोस्पेस वैज्ञानिक डॉ. शुभा व्यंकटेश अय्यंगार यांनी काढले.

ज्ञानयज्ञ फाउंडेशनच्या रक्षा संवाद या तिसऱ्या आवृत्तीमध्ये एरोस्पेस वैज्ञानिक डॉ. शुभा व्यंकटेश अय्यंगार यांनी मार्गदर्शन केले . या वेळी माजी एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी प्रमुख पाहुणे होते.
देशाच्या स्वदेशी तंत्रज्ञान विकासातील व विज्ञान क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी शुभा अय्यंगार यांना पद्मश्री देऊन गौरविण्यात आले. बेंगळुरू येथील नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजमध्ये त्यांनी ४६ वर्षे सेवा केली. विमानवाहतूक सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी स्वदेशी ‘दृष्टी’ आणि एव्हिएशन वेदर ऑब्झर्वेशन सिस्टिम विकसित करण्यात मोलाचा वाटा होता. या विषयी अय्यंगार यांनी माहिती दिली.

या वेळी अय्यंगार म्हणाले, ‘‘दृष्टी’ हे विमानतळांवर धावपट्टीवरील (रन-वे) दृश्यमानता अचूकपणे मोजणारे एक स्वदेशी अत्याधुनिक ट्रान्समिसोमीटर यंत्र आहे. खराब हवामानात व धुक्यात विमानांना सुरक्षितपणे उतरण्यास मदत करणारी ही प्रणाली देशातील जवळपास सर्वच मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळांवर आणि भारतीय हवाई दलाच्या अनेक तळांवर वापरले जाते.’ ‘या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे, परदेशातून खरेदी केल्या जाणाऱ्या महागड्या उपकरणांवर असणारे भारताचे अवलंबित्व कमी झाले. ही प्रणाली विकसित करताना कमीत कमी खर्चात तयार करण्यावर भर होता. या माध्यमातून मी माझ्या देशासाठी योगदान देऊ शकले, याचा अभिमान आहे,’ असेही त्या म्हणाल्या.