District Library Conference Promoting Reading Culture Collectively
सव्वादोनशे वाचनालयांचा लेखाजोखा एका दृष्टिक्षेपात!
Contributed by: प्रमुख सचिव,नाशिक|महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
जिल्ह्यातील वाचनालयांना एकत्र आणण्यासाठी नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाने पुढाकार घेतला असून, सर्व वाचनालयांच्या पदाधिकाऱ्यांचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्त जिल्ह्यातील वाचनालयांच्या माहितीचा समावेश असलेली पुस्तिका प्रकाशित केली जाणार आहे. प्रथमच असा प्रयत्न होत आहे.
जिल्ह्यात ‘अ’, ‘ब’, ‘क’ व ‘ड’ वर्गाची एकूण २२५ सार्वजनिक वाचनालये आहेत. त्यांच्या पदाधिकाऱ्यांत विचारांची व उपक्रमांची देवाणघेवाण व्हावी, वाचनसंस्कृतीत वाढ घडवण्यासाठी एकत्रित प्रयत्न व्हावेत, साळुंखे योजनेप्रमाणे अन्य शासकीय योजनांची माहिती व्हावी, वाचनालयांच्या समस्या शासनापुढे एकत्रितरीत्या मांडल्या जाव्यात या उद्देशांनी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने प्रथमच जिल्ह्यातील वाचनालय पदाधिकाऱ्यांचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. येत्या रविवारी (दि. २३) सार्वजनिक वाचनालयात हे एकदिवसीय संमेलन होत असून, त्यात प्रत्येक वाचनालयाचे दोन ते तीन सदस्य सहभागी होणार आहेत. संमेलनासह भोजन, चहा-नाश्त्याचा संपूर्ण खर्च सावाना करणार आहे. या संमेलनात ग्रंथालय संचालनालयाचे अधिकारी व ग्रंथसखा म्हणून प्रख्यात असलेले श्याम जोशी सहभागी होणार आहेत. यानिमित्त सावानाच्या वतीने ८० ते ९० पानांची विशेष पुस्तिका प्रकाशित केली जाणार आहे. त्यासाठी सर्व वाचनालयांकडून माहिती संकलित केली जात आहे. ही पुस्तिका म्हणजे जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालयांबाबतची मार्गदर्शिकाच राहणार असून, त्यात संस्थेच्या संपर्क क्रमांकापासून ते विभाग, उपक्रम, माजी पदाधिकारी, संगणकीकरण अशा इत्थंभूत माहितीचा समावेश राहणार आहे. जिल्ह्यातील एखाद्या संस्थेचा असा पहिलाच प्रयत्न आहे. सावाना अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, कार्याध्यक्ष संजय करंजकर, प्रमुख सचिव गिरीश नातू, जयप्रकाश जातेगावकर आदी या संमेलनाचे नियोजन करीत आहेत. सावानाचे ज्येष्ठ कर्मचारी दिलीप बोरसे, संजय रत्नपारखी परिश्रम घेत आहेत.वाचनालयाचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, स्थापना वर्ष, कार्यकारी मंडळ, ग्रंथसंख्या, सभासद संख्या, बालविभाग सभासद, दालने, देवघेव विभाग, बाल विभाग, मुक्तद्वार विभाग, वाचकांची संख्या, संदर्भ विभाग, अभ्यासिका, उपक्रम, पुरस्कार, माजी नामवंत पदाधिकारी, मान्यवरांच्या भेटी, संगणकीकरण, प्रकाशित केलेले ग्रंथ, दिवाळी अंक, वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न.