डॉक्टरांसाठी देशभरात एकच नोंदणी

महाराष्ट्र टाइम्स
डॉक्टरांसाठी देशभरात एकच नोंदणी
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
एका राज्यात नोंदणी असलेल्या डॉक्टरांना दुसऱ्या राज्यात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी स्वतंत्र नोंदणी किंवा परवाना घेण्याची गरज पडू नये, यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) नियमांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. राष्ट्रीय वैद्यकीय नोंदणी (एनएमआर) आणि विशिष्ट ओळख क्रमांकाच्या (यूआयडी) आधारे डॉक्टरांना देशभर व्यवसाय करता येणार आहे. त्यामुळे राज्यांच्या सीमा ओलांडून वैद्यकीय व्यवसाय करणे सुलभ होणार आहे. याबाबतचा सुधारित मसुदा ‘एनएमसी’ने प्रसिद्ध केला असून, त्यावर हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत.

‘एनएमसी’च्या नैतिकता आणि वैद्यकीय नोंदणी मंडळाने (ईएमआरबी) ११ ऑगस्ट रोजी ‘वैद्यकीय व्यावसायिकांची नोंदणी आणि वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी परवाना (सुधारणा) नियमावली, २०२६’चा मसुदा प्रसिद्ध केला. त्यानुसार राज्य वैद्यकीय परिषदेकडून नोंदणी आणि व्यवसायाचा परवाना मिळाल्यानंतर, ‘ईएमआरबी’कडून संबंधित डॉक्टरला ‘एनएमआर’मध्ये ‘यूआयडी’ दिला जाईल. राज्य आणि राष्ट्रीय नोंदणी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जोडली जाणार असल्याने एका नोंदणीतील बदल दुसऱ्यातही दिसतील.
‘यूआयडी’मध्ये संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाचा कोड आणि राज्य वैद्यकीय नोंदणी क्रमांकाचा समावेश असेल. हा क्रमांक मिळाल्यानंतर, डॉक्टरला देशातील कोणत्याही राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात वैद्यकीय व्यवसाय करता येईल. त्यासाठी पुन्हा स्वतंत्र नोंदणी किंवा परवाना घेण्याची गरज राहणार नाही. राज्य परिषदेने नोंदणी किंवा परवाना नाकारल्यास डॉक्टरला ३० दिवसांत ईएमआरबीकडे अपील करता येईल. ईएमआरबीनेही ३० दिवसांत निर्णय घेणे अपेक्षित आहे. एनएमसीने एप्रिलमध्ये प्रसिद्ध केलेला आधीचा मसुदा मागे घेतल्यानंतर हा सुधारित मसुदा प्रसिद्ध केला आहे.