‘एअर इंडिया’ इमारतीत १०६ हुतात्म्यांची नावे

महाराष्ट्र टाइम्स
names of 106 martyrs who sacrificed for united maharashtra displayed in air india building
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण चिरंतन राहावे, यासाठी राज्य सरकारच्या ताब्यात आलेल्या ‘एअर इंडिया’च्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या दर्शनी भागात त्यांची नावे ठळकपणे आणि सन्मानपूर्वक प्रदर्शित केली जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले आहेत.

सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठवून ही मागणी केली होती. संयुक्त महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आंदोलनात १०६ जणांनी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या बलिदानामुळे महाराष्ट्राची निर्मिती झाली असून, त्यांचे योगदान राज्याच्या इतिहासात अजरामर आहे, असे शेलार यांनी पत्रात नमूद केले होते.
एअर इंडिया इमारतीचे सध्या नूतनीकरण सुरू असून, लवकरच तेथे प्रशासकीय कामकाज सुरू होणार आहे. ही इमारत राज्य सरकारच्या महत्त्वाच्या प्रशासकीय केंद्रांपैकी एक ठरणार असल्याने मुख्य प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागात हुतात्म्यांची नावे आकर्षक आणि कायमस्वरूपी स्वरूपात प्रदर्शित करावीत, अशी मागणी शेलार यांनी केली होती. आवश्यक असल्यास सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून संबंधित विभागाला सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मागणीची दखल घेत मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील १०६ हुतात्म्यांना राज्याच्या महत्त्वाच्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार आहे.