बंद ‘पॉलिसी’नेही विमाधारकाला बुडवले

महाराष्ट्र टाइम्स
बंद ‘पॉलिसी’नेही विमाधारकाला बुडवले
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
बंद पडलेल्या विमा पॉलिसी पुन्हा सक्रिय करून देण्यासह, पॉलिसीत अडकलेली रक्कम परत मिळवून देण्याचे आणि मोठ्या रकमेचा आर्थिक लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबरचोरांच्या टोळीने ठाण्यातील एका व्यक्तीची तब्बल एक कोटी ४६ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू केला आहे.

घोडबंदर रोड परिसरात राहणाऱ्या ५३ वर्षांच्या तक्रारदारांनी पाच विमा पॉलिसी काढल्या होत्या. मात्र, कालांतराने प्रीमियम थकल्याने या पॉलिसी बंद पडल्या. याच पॉलिसींच्या संदर्भात संदीप शर्मा नावाच्या व्यक्तीने त्यांना फोन केला. बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करून देण्याचे आणि त्यामध्ये अडकलेले पैसे मिळवून देण्याचे आश्वासन त्याने दिले. त्यासाठी ३४ हजार ४०० रुपये नोंदणी शुल्क भरावे लागेल, असेही त्याने सांगितले. शर्मा याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तक्रारदारांनी त्याने सांगितलेल्या बँक खात्यात रक्कम जमा केली. त्यानंतर शर्मा याने शुल्काच्या नावाखाली त्यांच्याकडून आणखी एक लाख २२ हजार रुपये घेतले. पुढेही वेगवेगळी कारणे देत त्याने तक्रारदारांकडून पैसे उकळले.
काही दिवसांनी शर्मा याचा सहाय्यक असल्याचे सांगणाऱ्या रवीराज शुक्ला याने तक्रारदारांशी संपर्क साधला. शुक्ला याने सांगितल्याप्रमाणे तक्रारदारांनी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे पाठवले. अशा प्रकारे आरोपींनी तक्रारदारांकडून एक कोटी ४६ लाख २९ हजार रुपये घेतले. मात्र, त्यांना पॉलिसीची मूळ रक्कम आणि लाभासह अपेक्षित असलेली सुमारे दोन कोटी १२ लाख रुपयांची रक्कम मिळाली नाही. त्यानंतर तक्रारदारांनी शर्मा आणि शुक्ला यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांचे फोन बंद होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कासारवडवली पोलिस ठाण्यात तक्रार केली.