या संदर्भात बोलताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘एखादी तांत्रिक चूक झाली असेल, तर ती दुरुस्त केली पाहिजे. भाजपच्या सभा, विधिमंडळ तसेच राज्य सरकारच्या कार्यक्रमांमध्ये ‘ वंदे मातरम् ’ पूर्णपणे गायले जाते. केंद्र सरकारने केलेल्या नियमांचे पालन झाले पाहिजे आणि ‘वंदे मातरम्’ संपूर्ण गायले गेले पाहिजे.’‘वंदे मातरम्’ हे देशाच्या संस्कार, संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक आहे. भारतमातेला सर्वोच्च स्थान आणि तिरंग्याला सर्वोच्च मान देण्याची भावना पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
नागपूर महापालिकेच्या गुरुवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला ‘वंदे मातरम्’ची अर्धवट ध्वनिफीत वाजविण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. या प्रकाराची तत्काळ चौकशी करून जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावावी, असे आदेश महापौर नीता ठाकरे यांनी आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांना दिले आहेत.मनपाच्या सर्वसाधारण किंवा विशेष बैठकीची सुरुवात ‘वंदे मातरम्’ने करण्याची परंपरा आहे. केंद्र सरकारने ‘वंदे मातरम्’च्या रचनेला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यक्रमांमध्ये संपूर्ण गीताचे गायन करण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. त्यामुळे शासकीय कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’ची सहा कडवी सादर करणे अपेक्षित आहे. मात्र, २० ऑगस्ट रोजी झालेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला ‘वंदे मातरम्’ची केवळ पहिली दोन कडवी असलेली ध्वनिफीत वाजविण्यात आली. महापौर ठाकरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत आयुक्तांचे लक्ष वेधले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात प्रेरणास्थान ठरलेल्या या राष्ट्रीयगीताचा उचित सन्मान राखणे आवश्यक आहे. मनपाच्या सभेत अर्धवट ध्वनीफित वाजणे ही बाब योग्य नसून, यामागील हलगर्जीपणासाठी जबाबदारांवर कारवाई का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावावी, असे निर्देश त्यांनी दिले. यापुढे असा प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी ‘वंदे मातरम्’ गायनाची निश्चित कार्यपद्धती तयार करण्याचेही निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत.