Thane Municipal Corporation Recruitment Process Accelerated Written Exam On 1st And 2nd September
महापालिकेच्या भरती प्रक्रियेला वेग
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
ठाणे महापालिकेच्या गट ‘क’ आणि गट ‘ड’ संवर्गांतील भरती प्रक्रियेला अखेर मुहूर्त सापडला असून, तब्बल वर्षभर रखडलेल्या या प्रक्रियेला आता वेग आला आहे. ७०८ रिक्त पदांसाठी येत्या १ आणि २ सप्टेंबर रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या भरतीसाठी सुमारे २४ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे येत्या काळात महापालिकेतील रिक्त पदे भरली जाणार आहेत.
गावदेवी भाजी मंडई येथील आग दुर्घटनेनंतर अग्निशमन विभागातील अपुऱ्या मनुष्यबळाचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यावेळी आयुक्त सौरभ राव यांनी अग्निशमन दल व अभियांत्रिकी विभागामधील भरती प्रक्रिया तातडीने राबवणार असल्याची घोषणा केली होती. फायरमनच्या ३८१ जागा
महापालिकेने १० ऑगस्ट. २०२५ रोजी गट ‘क’ आणि गट ‘ड’मधील विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र, फायरमन पदांसाठी सरकारच्या ५ फेब्रुवारी २००८च्या निर्णयानुसार होमगार्ड जवानांना देण्यात येणाऱ्या समांतर आरक्षणाचा समावेश त्यावेळी करण्यात आला नव्हता. त्यामुळे आता शुद्धिपत्रक काढून फायरमन पदांच्या आरक्षणात सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार फायरमनच्या ३८१ पैकी १९ पदे होमगार्ड उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.