Career Opportunities In Indian Air Force Preparing From School
उलगडल्या भारतीय वायुदलातील करिअरच्या संधी
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
विद्यार्थ्यांनी भारतीय वायुदलातील अधिकारी म्हणून काम करण्याचा अनुभव, प्रशिक्षण, विमान उड्डाण, तांत्रिक व ग्राउंड ड्युटी, शिस्तबद्ध जीवनशैली आणि देशसेवेच्या विविध संधींबाबत उत्सुकतेने प्रश्न विचारले. फ्लाइंग ऑफिसर मुस्कान सिंह यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना अत्यंत सहज, आत्मीय आणि प्रेरणादायी पद्धतीने उत्तरे दिली. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय वायुदलात करिअर करण्याबाबत मोठी उत्सुकता, आत्मविश्वास निर्माण झाला.
राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) प्रवेश प्रक्रिया, भौतिक, रसायनशास्त्र, गणित विषयांचे महत्त्व, सर्व्हिस सिलेक्शन बोर्डची (एसएसबी) मुलाखत, निवड प्रक्रिया ते एरेनॉटिकल अभियांत्रिकीतील तांत्रिक संधी, याची माहिती एकाच वेळी जिल्ह्यातील बाराशे शाळांमधील ४० हजार विद्यार्थ्यांनी शनिवारी घेत आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न पाहिले. निमित्त होते जिल्हा परिषद समग्र शिक्षा अभियान अंतर्गत ‘ भारतीय वायुदल करिअर मार्गदर्शन’ विशेष कार्यक्रमाचे. फ्लाइंग ऑफिसर मुस्कान सिंह यांच्यासह मास्टर वॉरंट ऑफिसर देवेश कुमार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना भारतीय वायुदलातील विविध करिअरच्या संधी, प्रवेश प्रक्रिया, प्रशिक्षण, शिस्त, साहस आणि देशसेवेच्या संधींची माहिती मिळावी, या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एअर फोर्स स्टेशन, लोहगाव येथील फ्लाइंग ऑफिसर मुस्कान सिंह यांनी विद्यार्थ्यांना भारतीय वायुदलातील करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. मास्टर वॉरंट ऑफिसर देवेश कुमार यांनीही विद्यार्थ्यांना माहिती दिली.
सिंह यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भारतीय वायुदलात प्रवेश करण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध मार्गांची माहिती सोप्या व प्रेरणादायी पद्धतीने दिली. दहावी, बारावीनंतर भारतीय वायुदलात प्रवेश करण्याच्या संधी, एनडीए प्रवेश, पीसीएम विषयांचे महत्त्व, यूपीएससी मार्फत होणारी प्रक्रिया, एसएसबी मुलाखत व निवड प्रक्रिया, एनसीसी विशेष प्रवेश योजना तसेच एरोनॉटिकल अभियांत्रिकीसारख्या तांत्रिक क्षेत्रातील संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम., जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जितेंद्र जयस्वाल, शिक्षण सभापती अनिता मोठे, शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर आदींची उपस्थिती होती.
भानुदासराव चव्हाण सभागृहात हा ठिकाणी कार्यक्रम आयोजित होता. यासह जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही भारतीय वायुदलातील करिअरची माहिती एकाच वेळी उपलब्ध व्हावी, यासाठी शाळास्तरावर प्रोजेक्टर व मोठ्या स्क्रीनद्वारे कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्यामुळे एका केंद्रस्थानी आयोजित कार्यक्रमाचा लाभ इयत्ता नववी ते बारावीच्या एकाच वेळी जिल्ह्यातील बाराशे शाळांमधील सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये मोठ्या स्क्रीन व प्रोजेक्टरच्या माध्यमातून एकत्रितपणे हा कार्यक्रम पाहिला.