महारुद्र हनुमानाच्या दर्शनासाठी रांगा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
huge crowds of devotees at maharudra hanuman temple during shravan month
वाळूज महानगर : गंगापूर तालुक्यातील गवळी शिवरा येथील महारुद्र हनुमान मंदिरात शनिवार २२ ऑगस्ट रोजी श्रावण महिन्याचे औचित्य साधून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

शनिवारी पहाटे महारुद्र हनुमानाच्या मूर्तीची विशेष पूजा करून अभिषेक, आरती करून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले यावेळी महारुद्राच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमले होते. येथील महारुद्र हनुमान मंदिरात दर वर्षी श्रावण महिन्यातील शनिवारी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
शनिवारी सकाळपासून हजारो भाविक दर्शनासाठी आले. दर्शनासाठी मंदिर प्रशासनाने चोख व्यवस्था केली होती. या वेळी मंदिरामध्ये गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती; तसेच मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

भाविकांनी दर्शन रांगेत भक्ती भावाने 'जय श्रीराम' व 'बजरंग बली की जय'च्या घोषणा दिल्या. या वेळी भाविक भक्तीत तल्लीन झाले होते. गर्दी लक्षात घेऊन भाविकांच्या सोयीसाठी मंदिर व्यवस्थापन, ग्रामस्थ व स्वयंसेवकांकडून दर्शन व्यवस्था, पिण्याचे पाणी, प्रसाद व्यवस्था भाविकांनसाठी उपलब्ध करून दिल्या होत्या.

मंदिर परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शनिवारी दिवसभर दर्शनासाठी भाविकांचा ओघ सुरू होता. दर्शनानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.