Collective Fight For Sustainable Reservation Preparation For Meeting With Manoj Jarange
आरक्षणासाठी एकत्रित लढा
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
‘शाश्वत आरक्षणासाठी राजेंद्र दाते यांच्या सुरू असलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा, मराठा संघटना आणि आंदोलकांची दिशा समन्वयाने ठरवणार आहे. आमचे आंदोलन कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून आरोप-प्रत्यारोप बाजूला ठेवून समाजहिताला केंद्रस्थानी ठेवण्यात येणार आहे. मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करून अंतिम भूमिका जाहीर केली जाईल,’ अशी माहिती समन्वयक योगेश शेळके यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
शाश्वत मराठा आरक्षणासाठी मागील चौदा दिवसांपासून ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची सरकारने दखल घेतली नसल्याने आंदोलकांनी अंतिम भूमिका जाहीर केली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे योगेश शेळके म्हणाले, ‘गेल्या काही काळात मराठा संघटना, अभ्यासक, आंदोलक आणि विविध नेतृत्वाच्या भूमिकांबाबत समाजामध्ये गैरसमज निर्माण झाले आहेत. मराठा समाजाला कायदेशीरदृष्ट्या टिकणारे आरक्षण हवे आहे. ही मागणी कोणत्याही समाजाच्या हक्कांवर अतिक्रमण करण्याची नसून मराठा समाजातील आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या गरजू तरुणांना न्याय्य संधी उपलब्ध करून देण्याची आहे.’
‘मराठा समाजातील सर्व संघटना, आंदोलक, अभ्यासक, कार्यकर्ते आणि समाजहिताची भूमिका घेणाऱ्या सर्व घटकांनी वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून समाजाच्या व्यापक हितासाठी एकत्र येऊन संवाद, समन्वय आणि घटनात्मक मार्गाने पुढील दिशा निश्चित करावी,’ असे आवाहनही योगेश शेळके यांनी केले. ‘हे आंदोलन मनोज जरांगे यांच्या विरोधात असल्याचा भ्रम पसरविला जात आहे. त्यातून कटुता वाढत असल्यामुळे जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर शाश्वत आरक्षणासाठी एकत्रित लढा उभारू,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. या वेळी सुनील कोटकर, लक्ष्मणबापू शिरसाट, विजय काकडे उपस्थित होते.