काम चालू, सलून मात्र बंद; कारागिरांनी काढलेला मार्ग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
मुंबई, सोमवार - ‘काम चालू सलून बंद ’ ही येथील सलून कामगारांच्या संपातील नवी घोषणा आहे. म्हणजे आता बंद सलूनच्या बाहेरच्याच बाजूला कामगार केशकर्तनाचे काम स्वतंत्रपणाने करू लागले आहेत. मुंबई शहर-उपनगरांत अशी अनेक ‘खुली सलून्स’ निर्माण झाली असून, ग्राहक या सलून्सनाही आश्रय देताना आढळतात. काही कारागीर घरोघर जाऊन केशकर्तनाची कामे घेतात आणि त्यांना ती मिळतातही. ग्राहक त्यांचे घरीही स्वागत करतात. अशी खुली सलून्स-माटुंग्यात आठ, गवालिया टैंक भागात आठ, घाटकोपर, वार्डन रोड या भागात प्रत्येकी चार सुरू झाली आहेत.
तडजोड वेतन योजनासरकारने सुचविलेल्या तडजोड वेतन योजनेला कामगार संघटनेने मान्यता दिलेली आहे. जे सलून मालक तडजोड वेतनश्रेणी मान्य करतील, त्यांच्या दुकानातून काम करण्यास सलून कामगारांना परवानगी देण्यात आली आहे. कमी उत्पन्न गटांतील काही सलूनमालक अशी बोलणी करण्यास तयार झाले आहेत.