Chain Snatched From Womans Neck Motorcycle Theft Continues
महिलेचे मंगळसूत्र हिसकावले
महाराष्ट्र टाइम्स•
छत्रपती संभाजीनगर : शहरात दुचाकीचोरीचे सत्र अजूनही सुरूच आहे. शहरातील विविध भागांतून वाहनचोरांनी तीन दुचाकींसह एक रिक्षा चोरून नेल्याचे समोर आले आहे. यात अरिफ अफसर पठाण (वय ३६, रा. मिसारवाडी) यांची रिक्षा २० ऑगस्ट रोजी पहाटे अडीचच्या दरम्यान घरासमोरून चोरट्यांनी चोरून नेली. धर्मराज विनायकराव कोल्हे (वय ५२) यांची दुचाकी रांजणगाव येथील घरासमोरून चोरण्यात आली. याशिवाय महेंद्र सोपान पवार (वय २९, रा. स्वराज चौक, वडगाव कोल्हाटी) यांची दुचाकी घरासमोरून चोरण्यात आली. अकबर अफसर शेख (वय ४०, रा. भुजंगवस्ती, कमळापूर ) यांची दुचाकी व्हेरॉक कंपनीच्या समोरून चोरण्यात आली. प्रकरणात अनुक्रमे सिडको आणि एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जेवणानंतर पतीसोबत शतपावली करीत असलेल्या ६२ वर्षीय महिलेच्या गळ्यातून २७ ग्रॅमचे तीन लाख ८६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वारांनी हिसकावले. ही घटना १७ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास एन-११ परिसरातील सौभाग्य चौकात घडली. शहरात सोनसाखळी हिसकाविण्याची आठवड्यातील ही चौथी घटना आहे. यापूर्वी मंगळसूत्र, सोनसाखळी हिसकाविण्याच्या तीन घटना वेदांतनगर हद्दीत घडल्या आहेत.सिडको सौभाग्य चौकात घडलेल्या घटनेबाबत कल्पना कालिदास पाटील (वय ६२, रा. सुदर्शननगर, एन-११) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या १७ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास पतीसोबत जेवणानंतर शतपावली करीत होत्या.
गुरुकुल शाळेसमोरील रस्त्यावरील विद्युत खांबाजवळ त्या पतीसोबत थांबल्या असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांपैकी पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने पाटील यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावले. अंधार असल्याने पाटील यांना दुचाकीचा क्रमांक दिसला नाही. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल नाणेकर करीत आहेत.