भारताचा मार्ग खूपच खडतर

Contributed byभारताचा कर्णधार|महाराष्ट्र टाइम्स.कॉम
indian hockey team defeated by netherlands in world cup
भारतीय हॉकी संघाने वर्ल्ड कपमधील नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात चांगली सुरुवात केली होती; मात्र यजमानांनी पहिला गोल केल्यानंतर भारतीयांच्या चुका वाढल्या. त्यामुळे त्यांना शनिवारी १-३ अशा पराभवास सामोरे जावे लागले. यामुळे भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग चांगलाच खडतर झाला आहे.

भारतीय संघाची स्पर्धेतील वाटचाल आता शनिवारी रात्री उशिरा होणाऱ्या इंग्लंड-अर्जेंटिना सामन्यावर अवलंबून आहे. या सामन्यात इंग्लंड पराभूत झाल्यासच भारतास संधी असेल. हे घडल्यावरही भारतास अखेरच्या साखळी लढतीत अर्जेंटिनाविरुद्ध विजय पुरेसा नाही. त्यांना नेदरलँड्सने इंग्लंडला पराभूत करणेही गरजेचे आहे.
दुको तेल्गेनकाम्प (४१ मि.), तेब होएदमेकर्स (५१ मि.) आणि धिज्स व्हॅन डॅम (५५ मि.) यांनी मैदानी गोल करीत नेदरलँड्सचा विजय साकारला. भारताचा एकमेव गोल हरमनप्रीतने ५५व्या मिनिटास केला. भारतास सुमारे अर्धा डझन पेनल्टी कॉर्नर दवड़ल्याचा फटका बसला. त्यातच १-२ या पिछाडीनंतर आक्रमणाकडे पूर्ण लक्ष केल्यामुळे भारतास तिसरा गोल स्वीकारावा लागला आणि भारताच्या विजयाच्या आशाच दुरावल्या.