आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा मंगळवारपासून

महाराष्ट्र टाइम्स
international badminton tournament in pune august 25 30
पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटनेतर्फे ( पीडीएमबीए ) सुशांत चिपलकट्टी स्मृती कुमार गट आंतरराष्ट्रीय ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धेचे २५ ते ३० ऑगस्ट या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.

शिवाजीनगर येथील पी. ई. सोसायटीच्या मॉडर्न पीडीएमबीए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत एकूण पंधरा हजार डॉलर रकमेची पारितोषिके दिली जाणार असून, स्पर्धेत नऊ देशांतील खेळाडू कौशल्य पणाला लावणार आहेत. त्यात भारतासह यू. ए. ई., अमेरिका, इंडोनेशिया, थायलंड, नेपाळ, मलेशिया, नेदरलँड्स, भूतान या देशांतील खेळाडूंचा समावेश आहे. खेळाडू १९ वर्षांखालील मुलांच्या एकेरी आणि दुहेरीत; तसेच १९ वर्षांखालील मुलींच्या एकेरी आणि दुहेरीत आणि मिश्र दुहेरीत कौशल्य पणाला लावणार आहेत, अशी माहिती पीडीएमबीएचे मानद सरचिटणीस रणजित नातू यांनी दिली. या वेळी महापौर मंजूषा नागपुरे, शशांक हळबे आणि सारंग लागू आदी उपस्थित होते.
‘बॅडमिंटनचे जन्मस्थान असलेल्या पुण्यात ही स्पर्धा होत असून, ही स्पर्धा आता महापौर चषक स्पर्धा म्हणून ओळखली जाईल,’ अशी घोषणा महापौर नागपुरे यांनी केली.