Onion Prices May Rise To 60 Rupees Per Kg Garlic Priced At 300 Rupees
कांद्याची पन्नाशी, लसूण ३०० रुपयांवर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगल्या दर्जाच्या कांद्याची आवक घटल्याने दर वाढू लागले आहेत. वाशीच्या घाऊक बाजारात कांदा ४० ते ४५ रुपये किलोवर पोहोचला असून, किरकोळ बाजारात तो ५० रुपये किलोने विकला जात आहे. काही किरकोळ व्यापाऱ्यांच्या मते, येत्या काही दिवसांत कांद्याचा दर ६० रुपये किलोपर्यंत जाऊ शकतो.
वाशी बाजारात नाशिक, पुणे आणि राज्यातील विविध भागांतून कांद्याची आवक होते. दररोज सरासरी १०० गाड्या कांद्याची गरज असताना सध्या ७० ते ९० गाड्यांचीच आवक होत आहे. उत्कृष्ट दर्जाचा ‘एक नंबर’ कांदा कमी आल्याने दरवाढ झाल्याचे घाऊक व्यापारी मनोहर तोतलानी यांनी सांगितले. लसणाचे दरही वाढले आहेत. घाऊक बाजारात लसूण १०० ते २०० रुपये किलो, तर किरकोळ बाजारात ३०० ते ३५० रुपये किलोने विकला जात आहे. सणासुदीत कांदा-लसणाची फोडणी आणखी महागण्याची शक्यता आहे.