अंतराळ स्थानक उभारणीचे नियोजन

Contributed byम‌. टा. प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम
अंतराळ स्थानक उभारणीचे नियोजन
‘गगनयान ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे (इस्रो) राबवली जाणारी पहिली मानवी अंतराळ मोहीम असली तरी गगनयानच्या यशानंतर भारताचे स्वतःचे भारतीय अंतराळ स्थानक उभारण्याचे नियोजनाची सुरुवात झाली. यात वायुसेनेतील अनुभवी टेस्ट पायलट ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला होते, ही अभिमानाची बाब आहे,’ असे विचार माजी एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी व्यक्त केले. ज्ञानयज्ञ फाउंडेशनच्या रक्षा संवाद या तिसऱ्या आवृत्तीमध्ये विवेक राम चौधरी यांची प्रकट मुलाखत झाली. त्या वेळी चौधरी बोलत होते.

संत एकनाथ रंगमंदिर येथे आयोजित कार्यक्रमात एरोस्पेस वैज्ञानिक डॉ. शुभा अय्यंगार यांची विशेष उपस्थिती होती. उद्योजक मानसिंग पवार व देवानंद कोडगिरे पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी माजी वायुसेना अधिकारी विकी अग्रवाल यांनी चौधरी यांची मुलाखत घेतली.
वायुसेनेतील आपला अनुभवाविषयी सांगताना विवेक चौधरी यांनी भारतीय वायुसेनेतील ‘गो पील- गो नो - पील’ या प्रणाली विषयी माहिती दिली. युद्धाच्या मोहिमेदरम्यान वैमानिकांची सतर्कता, एकाग्रता वाढवण्यासाठी ‘गो-पील’ दिली जाते. ‘नो गो-पील’ या शांत करणाऱ्या औषधाने वैमानिकाला पुरेशी विश्रांती मिळते. ऑपरेशन मेघदूतविषयी माहिती देताना हे ऑपरेशन एप्रिल १९८४ पासून आजगाजतायत सुरू आहे. त्या काळी आम्हाला इथल्या कडाक्याच्या थंडीचा सामना करत या ग्लेशियरवरून विमान उडवण्याचे आव्हान होते.

आम्ही अंगावर कपड्यांचे थरवर थर चढवायचो. बोटांना इजा होऊ नये म्हणून प्लास्टिक बॅग बांधायचो, असे अंगावर काटे आणणारा अनुभव त्यांनी शेअर केला.

चौधरी म्हणाले, ‘एअरक्राफ्ट मिग २९ हे माझे आवडते एअरक्राफ्ट आहे. टेस्ट पायलट यांना मुळातच कुठल्याही नवीन व अपरिचित स्थितीत विमान चालवतात. विमानाची सुरक्षा आणि कार्यक्षमता तपासण्यासाठी ते सर्वप्रथम उड्डाण करण्याची जोखीम पत्करतात. शुभांशू शुक्ला यांनी गगनयानसाठी खडतर मेहनत घेतली.’ ‘भारतीय वायुसेनेत महिलांना बरोबरीचे स्थान आहे. युवतींनी वायुसेनेत जरूर यावे,’ असेही ते म्हणाले.

‘ऑपरेशन सिंदूरने जगाला भारतीय वायुसेनेची ताकद दाखवली. हे ऑपरेशन अजूनही सुरू आहे. वायुसेनेला इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप कालावधी गेला. अजूनही आपण स्वदेशी तंत्रज्ञानावर भर देत असून ही प्रक्रिया संथ वाटू शकते. पण आपण तंत्रज्ञानाबाबत स्वयंपूर्ण होत आहोत,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.

‘प्रत्येक नागरिक हा देशासाठी योगदान देऊ शकतो. रशिया युक्रेनच्या युद्धाकडे नीट बघितले तर लक्षात येईल की, युक्रेनकडे तितके सैन्य नाही. तिथली सामान्य नागरिक, ऑपरेटरपासून तरुण मुला-मुली युद्धात उतरली आहेत,’ असे विवेक राम चौधरी म्हणाले. सूत्रसंचालन कर्नल गिरीधर कोले यांनी व पद्मश्री केंडे यांनी प्रास्ताविक केले.