Astonishing Summit Ascent The Tale Of Nima Rinji Sherpa
जीवघेणी थंडी, बर्फाळ वादळे आणि मृत्यूच्या दाढेतून घेतलेली भरारी!
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
उणे ६० अंश सेल्सिअसची गोठवणारी थंडी, ताशी १०० किलोमीटर वेगाने अंगावर आदळणारी बर्फाळ वादळे, क्षणाक्षणाला डोकावणारा मृत्यू आणि पायांखाली हजारो फुटांची खोल दरी... जिथे ऑक्सिजन मिळवण्यासाठी छाती फाटून जाते आणि अनुभवी गिर्यारोहकांचेही पाय थरथरतात, तिथे वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षांपासून जगातील महाकाय शिखरांना गवसणी घालणाऱ्या एका वीस वर्षांच्या युवा शेर्पाने थराराची नवी व्याख्या लिहिली आहे. एव्हरेस्ट-ल्होत्सेची अवघ्या नऊ तासांत केलेली झंझावाती चढाई, काराकोरममधील ३६ तासांची सलग झुंज आणि मृत्यूच्या जबड्यातून सहकाऱ्यांचे प्राण वाचवणाऱ्या निमा रिन्जी शेर्पा या युवा गिर्यारोहकाशी साधलेल्या विशेष संवादातून प्रेरणादायी प्रवास उलगडला.
सरस्वती मंदिर ट्रस्ट संचलित सरस्वती छात्र सेनेच्या वतीने वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी ही ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या निमा रिन्जीशी संवाद साधण्याची संधी ठाणेकरांना मिळाली. या वेळी ज्येष्ठ गिर्यारोहक प्रा. चारुहास जोशी यांनी निमा रिन्जी शेर्पाची विशेष मुलाखत घेतली, तर संस्थेचे कार्यकारी विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी प्रास्ताविक केले.नेपाळमधील मकालु पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या गावात जन्मलेल्या रिन्जीला फुटबॉलपटून व्हायचे होते. कुटुंबातील शेर्पा वारसा आणि वडिलांचे कष्ट पाहून त्याची वाटचाल गिर्यारोहणाकडे झाली. वयाच्या १६व्या वर्षी कॉलेजचे शिक्षण सांभाळत पहाटे साडेसहा वाजल्यापासून सायकलिंग, रॉक क्लाइंबिंग आणि शारीरिक तंदुरुस्तीचा सहा महिन्यांचा कठोर सराव त्याने केला. त्याच वर्षी ‘मनास्लू’ हे पहिले शिखर सर केले. यानंतर एव्हरेस्ट आणि ल्होत्से ही दोन सर्वोच्च शिखरे अवघ्या नऊ तासांत सर करण्याचा विक्रम केला. काराकोरम पर्वतरांगेतील के२, ब्रॉड पीक, गॅशरब्रुमसारख्या शिखरांवरील मोहिमा आव्हानात्मक ठरल्या.
कांचनगंगा मोहिमेदरम्यान हवामान अचानक बिघडल्याने सुमारे ३० गिर्यारोहकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला. शिखर अगदी जवळ आले असतानाही त्याने माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. ‘विक्रम पुन्हा रचता येतात; मात्र गमावलेला जीव परत येत नाही,’ या विचारातून त्याने हा निर्णय घेतला. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमासोबत हवामान बदलाबाबत जनजागृतीचे कामही तो करत असल्याचे या संवादातून उपस्थितांना समजले.