चाकणच्या समस्यांवर ‘सरकारी डोस’

महाराष्ट्र टाइम्स
चाकणच्या समस्यांवर ‘सरकारी डोस’
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
चाकण औद्योगिक पट्ट्यातील खड्डे, अरुंद रस्ते, पाणीटंचाई, वीजपुरवठा, कचरा आणि स्टॉर्म वॉटर ड्रेनेजच्या प्रश्नांनी उद्योगविश्व त्रस्त असताना या सर्व समस्यांवर ‘इंटिग्रेटेड’ पद्धतीने उपाययोजना करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिले. लघुकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन अशा तीन टप्प्यांत कामांचे नियोजन करून, १० महिन्यांच्या आत समस्यांचे निराकरण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

चाकण ‘एमआयडीसी’मधील पायाभूत सुविधांच्या प्रश्नांमुळे उद्योग स्थलांतराची चर्चा सुरू झाल्यानंतर राज्य सरकारने या प्रश्नांची गंभीर दखल घेतली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गेल्या काही दिवसांत चाकणला भेट देऊन उद्योजकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ऑनलाइन बैठक घेऊन संबंधित यंत्रणांना सूचना केल्या होत्या. त्यानंतर त्यांनी रविवारी सामंत यांच्यासह चाकण औद्योगिक परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. चाकणमध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या सर्व यंत्रणांनी आता यंत्रणांनी एकाच आराखड्यानुसार काम करावे, अशा स्पष्ट सूचना दिल्याचे शिंदे म्हणाले.