स्तुत नाटकाचे शीर्षक तसे फसवे आहे; कारण नावावरून असे वाटते की प्रेमावर वा मैत्रीवर शिक्कामोर्तब असावे. पण प्रत्यक्षात कशावर शिक्कामोर्तब होते हे नाटकाच्या शेवटच्या प्रसंगातच समजते. ही कलाटणी भारी आहे, विनोदी नाटकाच्या जातकुळीला शोभणारी नाही. खूप दिवसांनी सागर कारंडेचे नाटकात आगमन, शिवाय सोबतीला भक्ती रत्नपारखी, कांचन पगारे असे कलावंत असल्याने साहजिकच वाटते की हे नाटक धमाल कॉमेडी असणार! शिवाय लेखक-दिग्दर्शक प्रमोद शेलार असल्याने आपण तशाच उत्सुकतेने आपण बघायला जातो. ‘तरंगिणी एन्टरटेनमेंट’ या संस्थेची ही निर्मिती हास्यसागराच्या लाटा निर्माण करणारी झालेली आहे. त्याच्या सोबतीने गंभीर राष्ट्रीय समस्या मांडताना त्या विषयावर काहीसा अन्याय झाल्यासारखे वाटते. विदेशी नागरिकांचा आपल्या देशात होणारा बेकायदा प्रवेश, त्यांचे नागरिकत्व, येथील नागरी व्यवस्थेवर पडणारा ताण व अन्य सामाजिक प्रश्न हा विषय प्रस्तुत नाटकात स्पर्शिला जातो. पण त्यातून काही हाती लागत नाही. एका साचेबद्ध विनोदी नाटक आणि करमणुकीच्या परिचित ढाचाला दिलेले वेगळे ‘वळण’ आपल्याला या नाटकाद्वारे अनुभवता येते.
नाटक सुरू होते तेव्हा वकिली क्षेत्रातील पती-पत्नी आणि त्यांचे घर पाहायला मिळते. आर्यन देसाई म्हणजे सागर कारंडे आणि शर्मिला देसाई म्हणजे स्नेहा पराडकर हे दोघेही वकिली पेशातले, मात्र दोघांमधील नवरा-बायको म्हणून दाखवलेले वाद-मतभेदाचे मुद्दे नेहमीचे (नोकरी-पेशा भिन्न असले तरी सामायिक!) व अलीकडच्या अनेक नाटकांतून मांडले गेलेले आहेत. नाही म्हणायला तिची वकिली जोरात चालते, तर त्याची साधारण. परिणामी घरातील कामे करण्याची जबाबदारी सागरवर येऊन पडते. त्यामुळे किचन सांभाळणे इत्यादीबाबत काही शाब्दिक विनोद घडतात. स्नेहाकडे मजनू ही बंगाली बायको अशील म्हणून येते आणि सागरकडे तिचाच बंगाली नवरा ‘अशील’ म्हणून येतो. (हे अतिशय अपेक्षित व ढोबळ वाटते.) पुढे मराठी नाटकात बंगाली भाषक पात्रे आल्यावर त्यांच्या बोलण्यातून निर्माण होणारा विनोद-गंमती व गैरसमज-गोंधळ यात पहिला अंक दीर्घकाळ चालतो. त्यात सागरसोबत कांचन-भक्ती हे कलाकार आपापले कौशल्य दाखवतात. मुळात या नाटकात घडणे कमी आहे आणि अधिक भर आहे तो शाब्दिक गमतीजमतीवर. सुरवातीला सागरची एकतर्फी खेळी चालू असते. प्रेक्षकांशी संवाद साधत तो हुकमी हशा घेतो. पैकी काही विनोद प्रसन्न वाटतात. पुढे कांचन पगारे हे बंगाली नवरा म्हणून आगमन करतात. रसगुल्ला, बंगाली बोली व त्याचे मराठीतील अर्थ यातून गोंधळ होतो. तो समजावून सांगणे-म्हणजे आपल्या मराठीमध्ये पुन्हा अर्थ सांगण्याचे काम सागर करतो. पण हे वारंवार झाल्याने मजेची मात्रा काहीशी कमी होते.
पहिला अंक लांबतो. वकील पती-पत्नीमधील भांडणे-मतभेद यांतून वेगळी परिस्थिती उभी राहत नाही. पण नाटकाचा रोख वेगळा आहे ते फक्त दुसऱ्या अंकातील आकस्मिक कलाटणीतून जाणवते. पण त्याची पार्श्वभूमी किंवा सुतोवाच सुरुवातीपासून आलेली नसल्याने प्रेक्षकांना शेवटी येणारे मुद्दे समजण्यास वा विचार करण्यास अवधीच मिळत नाही.
गंभीर समस्येचा या नाटकाशी संबंध हा सहज न वाटता जोडलेला वाटतो. की विनोदाच्या चौकटीमध्ये बंगाली जोडपे, त्याचे घटस्फोट घेणे आणि अनधिकृतपणे आपल्या देशात राहणे या बाबी आल्या असाव्यात. हा मुद्दा एका वेगळ्या नाटकाचा विषय होऊ शकतो. त्याकडे समाजाचे-सरकारचे गांभीर्याने लक्ष वेधले जाऊ शकते. परंतु प्रस्तुत नाटकातील अधिकांश भाग हा रंजन करणारा असल्याने सांगण्याचा हेतू, त्याबाबतीतले गंभीर मुद्दे, न्यायालय, कायदा-सुव्यवस्था इत्यादी बाबी पुरेशा तपशीलात उभ्या राहत नाहीत. तसा अवधी व प्रसंगात स्थान मिळत नाही.
विनोदी अभिनेता म्हणून सागर कारंडेचा खास असा प्रेक्षकवर्ग आहे. त्याचे शाब्दिक विनोद या नाटकात आहेत. पण त्यात अधिक ताजे आणि प्रासंगिक विनोद आले तर नाटकात काही ‘नाट्य’ घडत नसल्याची उणीव भरून निघाली असती. मुळात विनोद सकस लागतो तसे नाट्यही प्रभावी लागते. आपले मराठमोळे प्रेक्षक किती काळ ‘बंगाली’ विनोदात रमणार? सागर-स्नेहा हे दोघे वकील म्हणून प्रेक्षकांना ‘अपील’ होतील का? शिवाय साथीला कांचन पगारे व भक्ती रत्नपारखी हे असल्याने नाटक अधिक विनोदी होईल? अर्थात त्यांच्या वागण्या- बोलण्यातून विनोद घडतो.(दुर्दैवाने त्यांची ‘गोष्ट’च सुस्पष्ट होत नाही!) दिग्दर्शकाने नाटकाला हालचालींद्वारे गती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे काही प्रमाणात विनोदी शैलीतील नाटक पाहायला मिळते.
शीतल तळपदे यांच्या प्रकाशयोजनेस खास वाव नाही. अभिजित पेंढारकर यांचे संगीत आणि वलय मुळगुंद यांचे गीत अनुरूप वाटते. वेशभूषेतून कांचन-भक्ती यांचे बंगाली रूप दिसते (श्रेय दर्शना चौधरी यांचे) पण सागर-स्नेहा ‘वकील’ वाटण्याच्या दृष्टीने व त्यातून स्वभाव-व्यक्तिमत्त्वे कशी अधोरेखित होतील याचा विचार व्हावा. पण मुळातच लेखन दिग्दर्शनाचा रोख वेगळा असल्याने ते विनोदाकडे अधिक झुकणारे झाल्याने साहजिकच विनोदावर अधिक शिक्कामोर्तब होते.
प्रमोद शेलार हेच लेखक व दिग्दर्शक असल्याचे फायदे काही प्रसंगातून जाणवतात. तरीही आणखी सफाईने बांधणी, योग्य ठिकाणी कात्री लावणे अपेक्षित आहे. लोकप्रिय विनोदी अभिनेता सागर कारंडे या नाटकात आहे म्हणून प्रेक्षक येतीलही; पण प्रेक्षकांना त्याचे वकिली पेशातील रूप आणि त्यातून साधलेले शाब्दिक विनोदाचे ‘टायमिंग’ आणि कथानकाचा वेध घेणारे नाट्य अनुभवायला मिळाले तर?
स्पर्धा –प्रायोगिक रंगभूमी गाजवणारे प्रमोद शेलार आता व्यावसायिक रंगभूमीवर पाय रोवताना दिसत आहेत. वेगळा, गंभीर विषय मांडण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो, त्याबद्दल अभिनंदन. पण त्याबाबतची सखोलता आणि अधिक पैलू अपेक्षित आहेत. मुळात आशिष देशपांडे यांची संकल्पना धाडसी आहे; पण एखाद्या समस्येवर लोकमताचे शिक्कामोर्तब व्हावे, जनजागृती व्हावी असे वाटत असेल तर काही प्रसंगांतून ठोस मुद्दे आणायला हवेत. कायदेशीर बाब, सामाजिक व वैयक्तिक समस्यांचा पट त्यातून उभा राहू शकेल. लोकांना चांगले नाटक बघायचे आहे आणि तशीही विनोदाच्या माध्यमातून सामाजिक समस्या मांडण्याची आपल्याकडे नाट्य-परंपरा आहे जी आचार्य अत्रे, कानेटकर अशा अनेक नाटककारांनी रुजवलेली आहे. म्हणूनच नेमके काय सांगायचे आहे, आणि प्रेक्षकांना जे हवे आहे ते मिळतेय का, या प्रश्नांची काही उत्तरे शोधली गेली तर नाटक अधिक विषयास धरून आणि प्रेक्षकाभिमुख होऊ शकेल.