Fadnaviss Scathing Attack On Congress Rahul Gandhis Opposition Stands Out
‘काँग्रेस हा बोलघेवड्यांचा पक्ष’
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
‘ काँग्रेस हा आता पूर्णपणे दिशाहीन आणि केवळ बोलघेवड्यांचा पक्ष झाला आहे. जमिनीशी त्यांचा कोणताही संपर्क उरलेला नाही. केवळ टीव्हीवर प्रासंगिक राहण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे,’ असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केला. येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. तसेच, नागपुरात नुकत्याच झालेल्या तरुणांच्या महाकाय कार्यक्रमाचे कौतुक करीत, हीच महाराष्ट्राची खरी ‘जेन-झी’ असल्याचेही ते म्हणाले.
‘संविधानातील सर्वोच्च व्यवस्था असलेल्या संसदेत ३३ टक्के महिला पोहोचल्या पाहिजेत, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. मात्र, राहुल गांधी व त्यांच्या पक्षाने या क्रांतिकारी महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून ते हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. महिलांना अधिकार देणाऱ्या या ऐतिहासिक पावलाला विरोध करणाऱ्या राहुल यांनी महिला सक्षमीकरणावर बोलणे हा दुटप्पीपणा आहे,’ अशी टीका फडणवीस यांनी केली.‘विधिमंडळांतील महिला
आरक्षणाला पाठिंबा द्या’
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुण्यात ‘छात्रों की गूँज’ कार्यक्रमात विद्यार्थिनींशी संवाद साधताना पितृसत्ता मोडून काढण्याचे आवाहन केले. तसेच, मनुस्मृती मानसिकतेवर टीका केली. त्यावरून भाजपने रविवारी त्यांना लक्ष्य केले. ‘राहुल यांनी महिलांबाबतची आपली भावना प्रत्यक्षात आणण्यासाठी विधिमंडळांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू करण्यास पाठिंबा द्यावा. तसेच, आपल्या पक्ष कार्यालयात देवी दुर्गेचा उल्लेख असलेल्या ‘वंदे मातरम्’चे संपूर्ण गायन आयोजित करावे’, असे आवाहन भाजपच्या सरचिटणीस स्मृती इराणी यांनी केले.
‘तरुणांची निर्मळ मने
कलुषित करू नका’
नवी दिल्ली : ‘मनुस्मृती मानसिकता’ या टिप्पणीबद्दल आणि विद्यार्थिनींना पितृसत्ताक पद्धत मोडून काढण्याचे आवाहन केल्यावरून विश्व हिंदू परिषदेने रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र डागले. ‘आपल्या दूषित मानसिकतेने देशातील तरुणांची निर्मळ मने कलुषित करू नका’, असे आवाहन करताना, ‘इतर धर्मांमध्ये महिलांबद्दल जे सांगितले जाते ते जाहीरपणे बोलण्याचे धाडस काँग्रेस नेते करतील का’, असा प्रश्नही संघटनेने उपस्थित केला.