ठाण्यात मेट्रो-४ या मार्गिकेचे काम प्रगतिपथावर आहे. या कामादरम्यान ा माजिवडा जंक्शन येथील मेट्रो पुलाच्या पॅनलमध्ये भेगा दिसत असल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल झाली होती. या घटनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसह पाहणी केली.
ठाण्यातील मुलुंड चेकनाक्यापासून थेट घोडबंदर रोडवरील गायमुखपर्यंत एमएमआरडीएकडून वडाळा- घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो-४ मार्गिकेच्या उभारणीचे काम सुरू आहे. या मार्गिकेववरील माजिवडा येथील चित्रफीतीची माहिती मिळताच शिंदे यांनी भेट दिली. मेट्रोच्या मार्गावरील वळणाजवळ काही पॅनल सुटल्यासारखे प्रथमदर्शनी दिसत होते. मात्र, हे पॅनल बसवताना बीम कास्टिंग आणि स्टिचिंगद्वारे ते एकमेकांना जोडले जातात. हे पॅनल कास्ट करून बनवले जात असल्याने ते एकाच आकाराचे असतात. इतर ठिकाणी पॅनल सलग दिसत असले, तरी मेट्रो जिथे वळते तिथे मात्र त्यात थोडा फरक पडत असल्याने ते सुटल्यासारखे दिसतात. असे दिसून येत असले, तरी आतून ते मजबूत असल्याचे या पाहणीत अभियंत्यांनी सांगितले. या वेळी एमएमआरडीएचे वरिष्ठ अभियंता डॉ. विनय सुर्वे उपस्थित होते.