Tragic Suicide Of Mla Rohit Pawars Pas Daughter In Baramati
आमदार रोहित पवार यांच्या पीएच्या मुलीची आत्महत्या
महाराष्ट्र टाइम्स•
पालक रागावल्याने घरातून निघून गेलेली अवनी अजित दशावतारी ही बारामती येथील १४ वर्षीय मुलगी रुई येथील स्वामी समर्थ बिल्डिंगजवळ रविवारी सकाळी मृतावस्थेत आढळून आली. ती आहिल्यानगरमधील कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहायक अजित दशावतारी यांची मुलगी आहे.
याबाबत मुलीचे वडील अजित माणिक दशावतारी यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दशावतारी कुटुंब साईनगर, रुई परिसरातील स्वामी समर्थ आयकॉन या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहते. शनिवारी रात्री १०च्या सुमारास पालक अवनीवर रागावले. त्यानंतर ती रागाच्या भरात घरातून निघून गेली. बराच वेळ शोध घेऊनही ती सापडली नाही. वाजता आई-वडील आणि नातेवाइकांनी रविवारी पहाटे ३.४५ वाजता बारामती तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांकडून मुलीचा शोध सुरू असताना ‘डायल ११२’वर कार्यरत पोलिस कर्मचारी कृष्णा कांबळे यांना रुई हद्दीतील स्वामी समर्थ इमारती बाजूला एक मुलगी मृतावस्थेत पडल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी गेल्यानंतर मुलीचे नातेवाइकांनी खात्री केली असता, ती अवनीच असल्याचे समोर आले आहे. पालक रागावले असल्याने मुलीने राहत्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपास समोर आले आहे.