ठाण्यात फेरीवाले पदपथावर

महाराष्ट्र टाइम्स
ठाण्यात फेरीवाले पदपथावर
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
मुंबई उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर मुंबई महापालिकेने ‘पादचारी प्रथम’ मोहिमेंतर्गत पदपथ अडथळामुक्त करण्याची मोहीम सुरू केली आहे. मात्र, ठाणे शहरात पदपथांवरील अतिक्रमणाचा प्रश्न अद्याप कायम आहे. फेरीवाल्यांनी पदपथांवर कब्जा केला असताना अनेक दुकानदारही व्यवसायासाठी पदपथांचा वापर करत आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. तरीही पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

ठाणे शहरात फेरीवाले उदंड झाले असून, महापालिकेच्या कारवाईला न जुमानता ते पदपथांवर बसून व्यवसाय करत असल्याचे दिसून येते. शहरातील प्रत्येक रस्त्यालगत असलेले पदपथ फेरीवाल्यांनी गिळंकृत केल्याने पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथ राहिलेले नाहीत. पदपथांबरोबरच फेरीवाले रस्त्यावरही थेट रस्त्यावर सामान ठेवून विक्री करत आहेत. तसेच, रस्त्यावर बेधडकपणे हातगाड्या उभ्या केल्या जात असून, या हातगाड्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असूनही त्या हटवल्या जात नाहीत. काही ठिकाणी रस्त्याला बाजाराचे स्वरूप आल्याने वाहतुकीची मोठी समस्या उद्भवत आहे. सुरुवातीला एका विक्रेत्याने रस्त्यावर बस्तान मांडल्यानंतर काही दिवसांनी दुसरा विक्रेता त्या ठिकाणी येतो. हळूहळू आणखी फेरीवाल्यांची संख्या वाढत संपूर्ण पदपथांवर फेरीवाल्यांचे साम्राज्य पसरते.
महापालिकेकडून फेरीवाल्यांवर थातुरमातुर कारवाई केली जात आहे. पदपथांवरून फेरीवाले हटवल्यानंतर महापालिकेचे पथक माघारी फिरताच पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ होते. महापालिकेचे पथक कारवाई करण्यासाठी येणार असल्याची अगोदरच फेरीवाल्यांना कुणकुण लागते आणि पथक पोहोचण्यापूर्वीच फेरीवाले गायब होतात. मग कारवाईविना पथकाला माघारी फिरावे लागते.

पदपथांवरील फेरीवाल्यांच्या गराड्यातून जाताना पादचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत असतानाच दुकानदारही पदपथांवर अतिक्रमण करण्यात आघाडीवर आहेत. दुकानातील वस्तू थेट पदपथांवरच विक्रीसाठी ठेवण्यात येत आहेत. काही व्यावसायिक पदपथांवरच अन्न शिजवतात. सर्वच प्रकारच्या अतिक्रमणामुळे पदपथांवरून चालण्यासाठी पादचाऱ्यांना जागा शिल्लक राहत नाही. जीव मुठीत धरून पादचाऱ्यांना रस्त्यावरून पायी जावे लागत असून, यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी मुलांची मोठी तारांबळ उडत आहे.

पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिकेतील अधिकारी उदासीन असून, फेरीवाल्यांना प्रथम, तर पादचाऱ्यांना दुय्यम स्थान मिळत आहे. पाच वर्षांपूर्वी कासारवडवलीमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाईच्या वेळी महापालिकेच्या तत्कालीन सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर भाजीविक्रेत्याने जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यानंतरही महापालिका प्रशासन फेरीवाल्यांसंदर्भात सौम्य भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

महापालिकेकडून फेरीवाल्यांवर नियमित कारवाई करण्यात येत असून, सध्या शहरात फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरू आहे, असे ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी सांगितले.