Nine Layers Of Govinda Teams Records At Dahi Handi Festival
सराव दहीहंडीत थरांची ‘नऊ’लाई
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
दहीहंडी उत्सवात नऊ आणि दहा थरांचे विक्रम रचणाऱ्या गोविंदा पथकांनी यंदा सराव दहीहंडी शिबिरात आणि सरावादरम्यान नऊ थर ांची सलामी देण्याचा अनोखा मान मिळवला आहे. वागळे इस्टेट येथील ‘सीपी तलावचा राजा’ गोविंदा पथकाने ठाणे पूर्वेतील कोपरी येथे सराव शिबिरात नऊ थर रचले. तसेच, पाचपाखाडी येथील ‘ठाण्याचा राजा’ गोविंदा पथकाने सरावात नऊ थर उभारत शहरातील गोविंदा पथकांना एकप्रकारे आव्हान दिले आहे.
गोकुळाष्टमीच्या दिवशी उंच थरांच्या दहीहंडी फोडण्यासाठी मुंबई, ठाण्यातील गोविंदा पथके महिनाभर सराव करतात. या पूर्वतयारीची रंगीत तालीम म्हणून सराव शिबिर, अर्थात चोर दहीहंडी उभारण्याची परंपरा आहे. मुंबईच्या माझगाव, गिरणगावात चोर दहीहंडी उभारण्याची चार दशकांची मोठी परंपरा कायम आहे. मात्र, ठाणे शहराची गेल्या काही वर्षांपासून दहीहंडी उत्सवाच्या पंढरीची ओळख निर्माण होत असतानाच चोर दहीहंडीच्या आयोजनातही भर पडत आहे.ठाण्यातील गोविंदा पथकांना सरावाची संधी मिळावी म्हणून चोर दहीहंडी आयोजित केली जाते. या चोर दहीहंडी उत्सवात थरांचे प्रात्यक्षिक दाखवणाऱ्या गोविंदा पथकांना त्यांच्या कामगिरीनुसार रोख बक्षीस आणि आकर्षक चषक देऊन गौरवले जाते.
यंदा वागळे इस्टेट येथील ‘सीपी तलावचा राजा’ गोविंदा पथकाने कोपरीच्या अष्टविनायक चौकात शिवसेनेचे (उबाठा) विधानसभा युवा अधिकारी राजेश वायाळ (पाटील) यांनी आयोजित केलेल्या निष्ठेची सराव दहीहंडी शिबिरात नऊ थर रचले. यंदा या शिबिराचे चौथे वर्ष असून, दरवर्षी शेकडो गोविंदा पथके या ठिकाणी हजेरी लावत सलामी देतात. मात्र, यंदा ‘सीपी तलावचा राजा’ पथकाने येथे अनोखा विक्रम केल्याचा अभिमान असल्याचे आयोजक वायाळ यांनी सांगितले.