Street Vendor Issues At Kalyan Station Passenger Inconvenience Rises
कल्याण स्थानक कोंडीत
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
रेल्वे स्थानक परिसरात १५० मीटर अंतरापर्यंत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली असताना, कल्याण स्थानकाला फेरीवाल्यांचा विळखा पडला आहे. या फेरीवाल्यांच्या गराड्यातून स्टेशनपर्यंत पोहोचताना प्रवाशांची दमछाक होत आहे. या फेरीवाल्यांकडून उरलेला माल आणि कचरा जागेवर किंवा रस्त्याच्या कडेला फेकला जात असल्याने परिसरात अस्वचछ्ता वाढली असून दुर्गंधीचा त्रासही सहन करावा लागत आहे.
स्थानक परिसरात मागील पाच ते सहा वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना रस्ता ओलांडून स्थानकात पोहोचणे आणि बाहेर पडणे त्रासदायक ठरत आहे. अशातच रस्त्याच्या दुतर्फा, स्कायवॉकवर आणि उड्डाणपुलाखालून जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा ठाण मांडणाऱ्या फेरीवाल्यांच्या त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. फेरीवाल्यांना चुकूनही धक्का लागल्यास प्रवाशांना दमदाटी आणि प्रसंगी मारहाण केली जाते. आधीच उड्डाणपुलाच्या खांब उभारणीसाठी निम्म्याहून अधिक रस्ता ताब्यात घेतला गेला असताना स्थानक परिसराला रिक्षाचालकांचा विळखा पडलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून थेट रेल्वे स्थानकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा निम्म्याहून अधिक रस्ता फेरीवाल्यांना देण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे स्थानक ते सुभाषचंद्र बोस चौकापर्यंत खेकडे विक्री करणाऱ्या महिलांनी ताबा घेतला आहे. खरेदीसाठी होणारी ग्राहकांची गर्दी आणि रस्त्यावरच केली जाणारी दुचाकी पार्किंग यामुळे या परिसरात कोंडी होत आहे.
पुष्पराज हॉटेल ते स्टेशन या परिसरात मुख्य रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाल्यांच्या गर्दीतून वाट काढणे दिव्य ठरत असताना, या फेरीवाल्यांवर कारवाई का केली जात नाही?
एकीकडे डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवरील कारवाईसाठी अधिकाऱ्यांना धारेवर धरले जात असताना, सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या कल्याण स्थानकातील फेरीवाल्यांना मात्र अभय का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.