विविधतेचा आभास देणाऱ्या फंडांची गर्दी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
विविधतेचा आभास देणाऱ्या फंडांची गर्दी
तवणूकदारांच्या मनात आजही, जितके जास्त फंड, तितके जास्त विविधीकरण आणि जितके जास्त विविधीकरण तितका कमी धोका, असे ठसले आहे. प्रत्यक्षात अनेकदा तसं नसतं. आजही बऱ्याच गुंतवणूकदारांकडे वेगवेगळ्या नावांचे अनेक फंड आहेत ते त्यांनी नियोजनपूर्वक खरेदी केलेले नसून कालांतराने जमा झाले आहेत.

विविधीकरणासाठी फंड योजनांची संख्या महत्त्वाची नसून गुंतवणूकदाराचे उद्दिष्ट, गुंतवणूक कालावधी, जोखीम स्वीकारण्याची तयारी आणि विविध मत्ता प्रकारांत विभागणी करण्यामागील विचार महत्त्वाचा आहे. मत्ता विविधीकरण म्हणजे वेगवेगळ्या नावांच्या फंड योजना खरेदी करणे नसून आपली गुंतवणूक विविध मत्ताप्रकारांत विभागणे, त्याचे बाजारमूल्य वाढवणे, विविध क्षेत्रांत गुंतवणूक करणे. गुंतवणूक तंत्रांचा वापर करून या सर्वांचा समतोल साधणे असा होईल.
गुंतवणूक संचात फंडाच्या १०-१५ योजना असतील, तर त्यातील अनेक फंड हे एकसारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असल्याने दुहेरी गुंतवणूक होऊन गुंतवणुकीचे वास्तविक विविधीकरण होत नाही. गुंतवणूक संच तेवढा गुंतागुंतीचा होतो.

सर्वसाधारणपणे बहुतेक सर्वच गुंतवणूकदारांसाठी योग्य निवड केलेल्या चार ते सहा फंड योजना पुरेशा आहेत. याहून कमी योजना असतील तर त्यामुळे योग्य मत्ताविभाजन होत नाही आणि अस्तित्वात असलेल्या योजनांच्या व्यवस्थापन धोरणावर अवलंबून राहावे लागते. योग्य कारणांशिवाय चारहून अधिक योजना असतील तर अनेकदा समान शेअर्समधील गुंतवणूक वाढते. फंडाची संख्या वाढवण्याऐवजी त्यातील अंतर्गत गुंतवणूकीकडे लक्ष द्यावे. गुंतवणुकीत विविधता येण्यासाठी पुढील वेगवेगळ्या फंड प्रकारांचा विचार करता येईल.

गुंतवणूक संलग्न बचत योजना (इएलएसएस) : या योजनांतील बहुतांश गुंतवणूक फंडाच्या मानद निर्देशांकातील शेअरमध्ये असून त्यावर करसवलत मिळते. गुंतवणूक तीन वर्षे बंदिस्त राहते (लॉक). नव्या करव्यवस्थेत नियम बदलले असल्याने त्यावर करसवलत मिळणार नाही. यातील काही योजना सातत्याने आकर्षक मासिक / त्रैमासिक परतावा लाभांश स्वरूपात देत असल्याने नियमित पैशाची आवश्यकता असलेल्या आणि करसवलतीची जरूर नसलेले गुंतवणूकदार योजनेचे स्वरूप समजून घेऊन गुंतवणूक करू शकतात.

फ्लेक्सिकॅप / मल्टिकॅप फंड : यातील गुंतवणूक लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप कंपन्यांत केली जाते. फ्लेक्सिकॅप फंडाचा व्यवस्थापक त्याच्या मर्जीनुसार कोणत्याही प्रमाणात स्मॉल, मिड आणि लार्ज कॅप कंपन्यांत गुंतवणूक करू शकतो मल्टीकॅप फंडाच्या व्यवस्थापकास त्याची किमान गुंतवणूक प्रत्येक प्रकारात २५% ठेवावीच लागते.

मल्टी ॲसेट फंड : यातील गुंतवणूक दिलेल्या मर्यादेत शेअर्स, बॉण्ड, परदेशातील गुंतवणूक, कमोडिटी, रिटस, इनव्हिट यामध्ये केली जाते. अन्य फंडाच्या तुलनेत या प्रकारातील फंडाची गेल्या दोन वर्षातील कामगिरी आकर्षक आहे.

लार्ज अँड मिडकॅप फंड : यातील किमान प्रत्येकी ३५% मोठ्या आणि मध्यम कंपन्यांत केलेली असल्याने गुंतवणूक स्थिरता, वाढीची शक्यता याचा लाभ होतो.

हायब्रिड फंड : यातील गुंतवणूक शेअर्स आणि बॉण्डमध्ये कमी अधिक प्रमाणात विभागलेली असते बॉण्डची स्थिरता, कमी जोखीम आणि शेअर्समधून मिळू शकणारा उच्च परतावा यांचा समतोल साधून अधिक परतावा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो.

स्मॉल कॅप फंड : यांची गुंतवणूक छोट्या कंपन्यांमध्ये केली जाते यात अधिक जोखीम असली तरी भविष्यात अधिक परतावा मिळण्याची शक्यता असते. दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी असे फंड उपयुक्त आहेत.

फंड योजनांची निवड करताना

फंडाचा प्रकार आणि उपप्रकार समजून घ्या.

एकाच प्रकारातील अनेक फंड घेण्याऐवजी वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी योग्य फंड प्रकार निवडा.

दोन योजनांमधील दुहेरी गुंतवणूक (ओव्हरलॅपिंग) तपासा. जर ती ५०% अधिक असेल, तर त्यामुळे गुंतवणुकीचे विविधीकरण होत नाही हे लक्षात ठेवा.

उद्दिष्टांशी गुंतवणूक जोडा, प्रत्येक उद्दिष्टांचा कालावधी आणि जोखीमक्षमता वेगळी असू शकते.

गुंतवणूक विविधीकरणासाठी केवळ शेअर्सच नाही तर कर्जरोखे, सोनेचांदी, रिटस, इनवीट, विदेशी गुंतवणूक यांचाही ही विचार करावा.

बाजार हालचालीमुळे गुंतवणूक संचातील मत्ता संतुलन बदलले असेल तर ठराविक अंतराने ते समायोजित करा.

या प्रश्नांची उत्तरे शोधा.

फंड योजनांची संख्या कमी करताना...

अनावश्यक एसआयपी बंद कराव्यात.

विमोचन करताना त्यावरील करदेयता लक्षात घ्यावी.

आवश्यकतेनुसार वित्तीय सल्लागाराची मदत घ्यावी.