पॅरिस पॅरालिम्पिकमधील विजेता नीतेशकुमारने एसएल-३ कॅटेगरीतील पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत टोकियो पॅरालिम्पिकमधील विजेत्या प्रमोद भगतला २१-१८, २१-१६ असे पराभूत केले आणि सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर, नीतेशने तुलसीमतीच्या साथीत मिश्र दुहेरीत (एसएल-३ व एसयू-५) रौप्यपदक मिळवले. इंडोनेशियाच्या लियांनी ओक्टिला-हिकमत रमदानी यांनी नीतेश-तुलसीमती यांच्यावर ११-२१, २१-१९, २१-१४ अशी मात केली. एसएल-३ कॅटेगरीत पायाने अपंग असलेले खेळाडू, तर एसयू-५मध्ये हातांमध्ये किंवा वरच्या अवयवांत अपंगत्व असलेले खेळाडू कौशल्य पणाला लावतात.या वेळी सरशी
एकेरीतील विजयानंतर नीतेश म्हणाला, ‘गेल्या वेळी मी अगदी जवळ पोचलो होतो. तिसऱ्या गेममध्ये मी १९-१६ ने आघाडीवर होतो; पण नंतर हरलो. त्यामुळे या वेळी जिंकणे आणि तेही प्रमोदविरुद्ध पुन्हा दोन गेममध्ये जिंकणे, हे नक्कीच खूप खास आहे. मला वाटते, अशा गोष्टी अत्यंत दुर्मीळ असतात.’ २०१८च्या आणि गेल्या स्पर्धेत प्रमोदने सुवर्ण जिंकले होते.
संस्मरणीय पदार्पण
यानंतर नवीनने एसएल-४ कॅटेगरीतील पुरुष एकेरीत सुवर्णपदक मिळवले. त्याने इंडोनेशियाच्या फ्रेडी सेतियावानचा २१-९, २१-१७ असा पराभव करून स्पर्धेतील आपले पदार्पण संस्मरणीय केले. नवीन म्हणाला, ‘ही माझी पहिली आशियाई स्पर्धा होती; पण मी यापूर्वीच्या स्पर्धांमध्ये माझ्या सर्व प्रतिस्पर्ध्यांना भेटलो होतो. त्यामुळे दडपण येऊ नये म्हणून मी स्वतःला असे तयार केले, की ही एक सामान्य स्पर्धा आहे. ही माझी पहिली पायरी आहे. मला जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आणि ऑलिम्पिकमध्येही यश मिळवायचे आहे.’ ‘एसएल-४’मध्ये पायांत अपंगत्व असलेले; मात्र त्यांचे चालण्याचे-धावण्याचे संतुलन चांगले असते.
मानसीचे पहिले सुवर्ण
महिला दुहेरीत एसएल-३ व एसयू-५ कॅटेगरीत मानसी जोशी-तुलसीमती यांनी जेतेपदाला गवसणी घातली. अंतिम लढतीत यांग क्यूशिया-शिआओ झुशियान या चीनच्या जोडीवर २१-१६, २१-१३ अशी मात केली. मानसीचे हे या स्पर्धेतील पहिलेच सुवर्ण ठरले. मानसी-तुलसीमती यांना गेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. मानसी म्हणाली, ‘सामन्यापूर्वी आम्ही खूप सकारात्मक होतो आणि पूर्णपणे लयीत होतो. तुलसीसाठी हा खूप मोठा दिवस होता. माझा विचार असा होता, की एकही चूक करायची नाही. तिला अतिरिक्त जबाबदारी घ्यावी लागली आणि तिने अप्रतिम खेळ केला.’
पॅरिस पॅरालिम्पिक रौप्यपदक विजेत्या तुलसमतीने याआधी महिला एकेरी एसयू-५ कॅटेगरीत रौप्यपदक जिंकले होते. अंतिम सामन्यात तिला यांगकडून १८-२१, ११-२१ असा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर तिने नीतेशसह मिश्र दुहेरीत आणखी एक रौप्यपदक मिळवले.
चीनच्या ली फेंगमेईने नित्याश्री सुमती शिवनवर २१-१२, २१-१३ अशी मात केली आणि एकेरीतील एसएच-६ कॅटेगरीत (कमी उंची असलेले) सुवर्ण मिळवले.




