भारतामध्ये सध्या सर्वत्र ‘जेन झी’चा बोलबाला असताना फुटबॉलविश्वामध्ये आजपासून ‘ जेन अल्फा ’ च्या कौशल्याचा आविष्कार अनुभविण्यास मिळणार आहे. निमित्त आहे जागतिक फुटबॉल महासंघातर्फे ( फिफा ) आयोजित पहिल्यावहिल्या १५ वर्षांखालील फुटबॉल वर्ल्ड कपचे.
फुटबॉलविश्वातील युवा प्रतिभेला जागतिक व्यासपीठ देण्यासाठी आयोजित या महोत्सवी स्पर्धेत भारतासह १८९ देशांचे संघ सहभागी होत आहेत. नव्यानेच विकसित करण्यात आलेल्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आठवडाभर तब्बल ९४५ सामने होणार असून, उद्या, शनिवारी लाओसविरुद्धच्या सामन्याद्वारे भारतीय फुटबॉलपटू आपल्या मोहिमेचा प्रारंभ करतील.या स्पर्धेच्या निमित्ताने अझरबैजानची राजधानी असलेले बाकू हे शहर फुटबॉलमय झाले आहे. ‘फिफा’तर्फे मुख्य वरिष्ठ वर्ल्ड कप बरोबरच २० आणि १७ वर्षांखालील वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येते. वर्ल्ड कप जिंकलेल्या मेस्सीसह अनेक दिग्गज फुटबॉलपटूंनी या युवा वर्ल्ड कपच्या पाळण्यात आपल्या कौशल्याने जगाला विस्मयचकित केले. भारतामध्ये २०१७ आणि २०२२ मध्ये आयोजित मुलांच्या आणि मुलींच्या १७ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेतून त्याची प्रचिती आली होतीच. या स्पर्धेत उपविजेतेपद मिळविलेल्या फेरान टोरेस या स्पॅनिश फुटबॉलपटूने नुकत्याच झालेल्या वरिष्ठ वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिनाविरुद्धच्या अंतिम सामन्यात विश्वविजयी गोल केला होता; तसेच स्पेनच्या विश्वविजेत्या महिला संघामध्येही भारतामधील युवा वर्ल्ड कप विजयी संघात चमकलेल्या मुलींचा समावेश आहे.
‘टीन-एज’मध्येच लक्षवेधी खेळ करणाऱ्या स्पेनच्या लमिन यमालचे गारूड सध्या फुटबॉलविश्वावर आहे. तर, फ्रान्सच्या किलियन एम्बापे याने २०१८ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी वर्ल्ड कप जिंकला होता.
हा युवा वर्ल्ड कप म्हणजे फुटबॉलचा उत्सव आहे. जगभरातील फुटबॉलपटू, प्रशिक्षक, संघटना या निमित्ताने एकत्र येऊन ग्रासरूट फुटबॉलच्या विकासाकरिता मंथन करतील. वर्ल्ड कपमध्ये खेळणे ही काही मोजक्याच देशांची मक्तेदारी नसून, सर्व सदस्य देशांना जागतिक व्यासपीठ मिळण्याचा अधिकार आहे. ‘फिफा’च्या याच भूमिकेला अनुसरून हा फुटबॉल महोत्सव होतोय.
खेळाडूंचे वय लक्षात घेऊन या वर्ल्ड कपमध्ये छोटी मैदाने आहेत. प्रत्येक संघात ११ ऐवजी ८ खेळाडू असतील आणि ४५ ऐवजी २० मिनिटांची दोन सत्रे असतील. प्रत्येक गटात ६ संघ असून, गट साखळीनंतर अव्वल साखळी आणि ३० ऑक्टोबरला अंतिम सामना होईल.
मध्य आशियातील कॅस्पियन गल्फ भागामध्ये असलेले अझरबैजान सध्या पर्यटनासाठी हॉट डेस्टिनेशन आहे. त्यातच मोटार रेसिंगच्या थरारक फॉर्म्युला वन शर्यतीचेदेखील इथे आयोजन करण्यात येते. आता फुटबॉल वर्ल्ड कपमुळेही बाकू क्रीडाजगताचे लक्ष वेधून घेत आहे.