पॅरिस पॅरालिम्पिकमधील विजेता नीतेशकुमारने एसएल-३ कॅटेगरीतील पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत टोकियो पॅरालिम्पिकमधील विजेत्या प्रमोद भगतला २१-१८, २१-१६ असे पराभूत केले आणि सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर, नीतेशने तुलसीमतीच्या साथीत मिश्र दुहेरीत (एसएल-३ व एसयू-५) रौप्यपदक मिळवले.यानंतर नवीनने एसएल-४ कॅटेगरीतील पुरुष एकेरीत सुवर्णपदक मिळवले. त्याने इंडोनेशियाच्या फ्रेडी सेतियावानचा २१-९, २१-१७ असा पराभव करून स्पर्धेतील आपले पदार्पण संस्मरणीय केले.
मानसीचे पहिले सुवर्ण
महिला दुहेरीत एसएल-३ व एसयू-५ कॅटेगरीत मानसी जोशी-तुलसीमती यांनी जेतेपदाला गवसणी घातली. अंतिम लढतीत यांग क्यूशिया-शिआओ झुशियान या चीनच्या जोडीवर २१-१६, २१-१३ अशी मात केली. मानसीचे हे या स्पर्धेतील पहिलेच सुवर्ण ठरले. तुलसमतीने याआधी महिला एकेरी एसयू-५ कॅटेगरीत रौप्यपदक मिळवले.
ॲथलेटिक्समध्ये धडाका
भारताने ॲथलेटिक्स मोहिमची सांगता २२ सुवर्णपदके पटकावून केली. भारताने एकूण तीस सुवर्णपदके पटकावली, त्यात सर्वाधिक वाटा ॲथलेटिक्समधील यशाचा आहे. भारताच्या संदीप आणि हॅनी यांनी जागतिक विक्रमासह सुवर्णपदके जिंकली. मिझुहो पार्क अ ॅथलेटिक स्टेडियममध्ये झालेल्या पुरुषांच्या टी-६४ कॅटेगरीतील ४०० मी. शर्यतीत संदीपने ५२.२८ सेकंदांची वेळ नोंदवून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आणि सुवर्णपदक पटकावले. अजयकुमारने ब्राँझपदक मिळवले.
हॅनीला सुवर्ण एफ ३७/३८ कॅटेगरीतील भाला फेकमध्ये हॅनीने ६०.४९ मीटरची कामगिरी नोंदवून जागतिक विक्रमासह सुवर्ण पटकावले. इराणच्या होर्मोज सेइदीकाझपुंजीने ५०.६८ मीटर कामगिरीसह रौप्यपदक मिळवले. यासह भारताने पदकांचे शतक साजरे केले.
प्रणवचे दुसरे सुवर्ण पुरुषांच्या एफ-५१ कॅटेगरीतील क्लब थ्रोमध्ये प्रणव सूरमाने (३२.८७ मी.) सुवर्णपदक, तर धमरवीरने ब्राँझपदक मिळवले. प्रणवचे हे दुसरे सुवर्ण ठरले. प्रणवने थाळीफेकमध्येही सुवर्ण मिळवले होते.
सुमीतचे यश पॅरालिम्पिकमधील विजेत्या सुमीत अंतिलने एफ ४२-४४/६१-६४ कॅटेगरीतील भाला फेकमध्ये सुवर्णपदक पटकावले. जगज्जेत्या सुमीतने ७२.४६ मीटर कामगिरी नोंदवली. २०२३च्या स्पर्धेहीत त्याने सुवर्ण मिळवले होते. महेंद्र गुर्जरने (५९.०३ मी.) रौप्य, तर संदीप सरगरने ब्राँझ मिळवले.
दरम्यान, पॅरा नेमबाज मोना अग्रवाल आणि निषादकुमार आज, शनिवारी होणाऱ्या समारोप सोहळ्यात भारताचे ध्वजवाहक असतील.




