भारताचा स्टार खेळाडू पंकज अडवानीने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. पंकजने डब्ल्यूबीएल जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावले. त्याचे हे कारकिर्दीतील एकूण २९वे जगज्जेतेपद ठरले.
कस पाहणाऱ्या पाच तासांच्या अंतिम लढतीत ४१ वर्षीय पंकजने इंग्लंडच्या रॉबर्ट हॉलला १९०६-१२०६ असे पराभूत केले. २०१४मध्ये हे दोघे आमनेसामने आले होते. त्यात पंकजनेच बाजी मारली होती. त्यानंतर या टाइम्ड फॉरमॅटमध्ये पंकजने प्रथमच बाजी मारली. पाच वेळा जगज्जेतेपदाच्या अंतिम लढत स्थान मिळवणारया हॉलला पुन्हा एकदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.या अंतिम सामन्याच्या सुरुवातीला पंकजने ९१ गुणांच्या ब्रेक नोंदवला, तर हॉलने २०३ गुणांची शानदार खेळी करून सुरुवातीला आघाडी घेतली. सामन्याचे पहिले दोन तास पूर्ण होत आले, तेव्हा गुणतालिकेवर दोन्ही खेळाडू जवळपास समसमान स्थितीमध्ये होते. त्यानंतर पंकजने शतकी ब्रेकसह पुन्हा आघाडी मिळवली. मात्र, पुढील अर्धा तासात हॉलने अप्रतिम खेळ केला. त्याने ३३१ गुणांचा मोठा ब्रेक नोंदवला आणि आघाडी घेतली. जेव्हा ११५ मिनिटे शिल्लक होती, तेव्हा हॉलकडे १०१४-६९७ अशी आघाडी होती. तेव्हा हॉल आपले पहिले जागतिक विजेतेपद जिंकण्याच्या उंबरठ्यावर दिसत होता. मात्र, पंकजने हार मानली नाही. त्याने २१० गुणांचा ब्रेक नोंदवून हॉलची आघाडी कमी केली आणि आपले इरादे स्पष्ट केले. त्यानंतर लगेचच हॉलने एक सोपा शॉट मिस केला आणि पंकजला संधी मिळाली. या संधीचे सोने करून पंकजने या संपूर्ण चॅम्पियनशिपमधील सर्वांत संस्मरणीय खेळ दाखवला. त्याने ५८७ गुणांचा मोठा ब्रेक नोंदवला, जो या संपूर्ण विश्व चॅम्पियनशिपमधील या वर्षातील सर्वोच्च ब्रेक ठरला. या ऐतिहासिक कामगिरीसह त्याने आणखी एका संस्मरणीय जगज्जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. ‘फायनलचे दुसरे सत्र म्हणजे जणू दैवी खेळाची अनुभूती होती,’ असे हॉलने म्हटले. विजेतेपदानंतर पंकजने हॉलचे कौतुक केले. ‘तो एक उत्तम खेळाडू असून, त्याचे पहिले जगज्जेतेपद फार दूर नाही,’ असे पंकजने सांगितले.