पॅरिस : भारताच्या पी. व्ही. सिंधूने पॅरिस ओपन सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीतून उपांत्य फेरीत प्रवेश केला. दरम्यान, युवा भारतीय बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा हिचे आव्हान संघर्षपूर्ण लढतीनंतर उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले.
माजी जगज्जेती आणि दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेत्या सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत तैवानच्या चिउ पिन-चियान हिला ३९ मिनिटांत २१-१३, २१-१४ असे सरळ गेममध्ये पराभूत केले. उपांत्य फेरीत सिंधूची लढत जपानच्या हिना अकेची हिच्याशी होईल. अश्मिताला जपानची माजी जगज्जेती आणि ऑलिम्पिक ब्राँझपदक विजेती नोझोमी ओकुहाराविरुद्ध १०-२१, २१-१७, १६-२१ असा पराभव पत्करावा लागला.जागतिक क्रमवारीत ३६व्या स्थानावर असलेल्या २७ वर्षीय अश्मिताने गुरुवारी उपांत्यपूर्व फेरीपूर्व लढतीत तीन वेळा विश्वविजेती ठरलेल्या जपानच्या अकाने यामागुचीला पराभूत करून मोठा धक्का दिला होता.
पिन-चियानविरुद्ध सिंधूला अडचणी आल्या नाहीत; मात्र, पहिल्या फेरीत तिला क्रमवारीत २६व्या स्थानावरील सुपानिदा कातेथोंगविरुद्ध कडवे आव्हान पेलावे लागले होते. ‘पहिल्या फेरीच्या अनुभवामुळे मी अधिक सतर्क झाले. त्या सामन्यातून मला धडा मिळाला,’ असे क्रमवारीत ११व्या स्थानी असलेल्या सिंधूने सांगितले.