न्यूझीलंड मोहिमेवर असलेला भारतीय क्रिकेट संघ पहिल्या सामन्यात फलंदाजांच्या कामगिरीमुळे मोठे लक्ष्य पार करण्यात यशस्वी ठरला; परंतु विजयी कामगिरीत सातत्य राखायचे असेल तर शनिवारी न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० क्रिकेट सामन्यात गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल.
गेल्या काही महिन्यांपासून भारतीय गोलंदाज ठसा उमटवू शकलेले नाहीत. तशीच सामान्य कामगिरी गुरुवारी मालिकेतील पहिल्या सामन्यातही झाली. फलंदाजांनी चांगली कामगिरी केली नसती तर सामना भारताच्या हातून निसटला असता. भारताने २२६ धावांचे विक्रमी लक्ष्य पार करून पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली; परंतु फलंदाजांवर जास्त अवलंबून राहणे उर्वरित सामन्यांमध्ये महागात पडू शकते.आज, दुसऱ्या सामन्यातही फलंदाजांसाठी अनुकूल परिस्थिती राहण्याची शक्यता असल्याने गोलंदाजांना चुका टाळाव्या लागतील. पहिल्या टी-२०मध्ये सर्वाधिक धावा बहाल करणाऱ्या अक्षर पटेलवरही दबाव असेल.
वैभवला संधी?
ईशान किशन जखमी झाल्यामुळे १५ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीला या सामन्यात संधी मिळू शकते. तो अभिषेक शर्मासोबत डावाची सुरुवात करण्याची अपेक्षा आहे, तर संजू सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो. किशन जखमी झाल्यामुळे तिलक वर्माला पहिल्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आले होते; परंतु आता तो पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावरच येण्याची अपेक्षा आहे.
प्रतिस्पर्ध्यांच्या गोटातून
न्यूझीलंडचे वेगवान गोलंदाज मॅट हेन्री आणि एडम मिल्ने यांनी आपल्या पहिल्या स्पेलमध्ये बरेच स्विंग मिळवले; परंतु त्यांची लेंथ सॅमसन आणि अभिषेकसाठी पुरेशी प्रभावी ठरली नाही.