इंग्लंडचा पाकविरुद्ध मालिकाविजय

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
इंग्लंडचा पाकविरुद्ध मालिकाविजय
गोलंदाजांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर इंग्लंडने मालिकेतील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पाकिस्तानवर १९४ धावांनी मात केली. यासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.

इंग्लंडने पाकिस्तानला ११० धावांत रोखून पहिल्या डावात १८० धावांची आघाडी मिळवली होती. तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडची ७ बाद १७७ अशी स्थिती होती. रविवारी इंग्लंडचा दुसरा डाव २०८ धावांत आटोपला आणि पाकिस्तानला ३८९ धावांचे लक्ष्य मिळाले. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा दुसरा डाव १९४ धावांतच आटोपला आणि इंग्लंडने चौथ्या दिवशीच कसोटी जिंकली.
पाकची एक वेळ ३ बाद १४ अशी स्थिती झाली होती. सौदने शान मसूदसह चौथ्या विकेटसाठी १३९ चेंडूंत ९७ धावांची भागीदारी रचली. सौद शकीलने १२२ चेंडूंत १३ चौकार व दोन षटकारांसह ९७ धावा केल्या. ओली रॉबिन्सनने पाकच्या चौघांना बाद केले, तर जोश टंगने तिघांना माघारी पाठवले. रॉबिन्सनने पहिल्या डावातही चार विकेट घेतल्या होत्या. त्या जोरावर तो सामनावीर ठरला. इंग्लंडने पहिली कसोटी डावाने जिंकली होती. मालिकेतील तिसरी कसोटी नऊ सप्टेंबरपासून सुरू होईल.

संक्षिप्त धावफलक : इंग्लंड - पहिला डाव - सर्व बाद २९० आणि दुसरा डाव - सर्व बाद २०८ वि. वि. पाकिस्तान - पहिला डाव - सर्व बाद ११० आणि दुसरा डाव - ५०.५ षटकांत सर्व बाद १९४ (सौद शकील ९७, शान मसूद २६, अली उस्मान १६, ओली रॉबिन्सन ४-२४, जोश टंग ३-४६, जोफ्रा आर्चर २-७३).